नवी मुंबईच्या श्रीमंतीत व ऐश्वर्यात अधिक भर टाकणारा सिडकोचा खारघर येथील निर्सगसंपन्न गोल्फ कोर्स खेळाडूंच्या किती कामी आला, हा संशोधनाचा विषय असला तरी, खारघर हिलच्या पायथ्याशी व पांडवकडय़ाच्या कुशीत असणारा हा गोल्फ कोर्स सध्या पावसाळी सहली करणाऱ्या तळीरामांच्या एकच पेल्यासाठी आवडीचे ठिकाण झाले आहे. पांडवकडा धबधब्याच्या बाजूस या पाटर्य़ा झोडल्या जात असून सिडकोच्या सुरक्षा व्यवस्थेचे या मंडळींना आशीर्वाद असल्याचे दिसून येते. या पाटर्य़ा करणाऱ्यांमध्ये सिडकोच्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याची चर्चा आहे.
खारघर सेक्टर २३, २४, २५चा काही भाग मिळून सिडकोने हा
१०३ हेक्टर क्षेत्रफळावरील गोल्फ कोर्स तयार केला आहे. गोल्फ क्षेत्रात निष्णांत असणाऱ्या ऑस्टेलियाच्या पॅसिफिक कंपनीने या गोल्फ
कोर्सचे डिझाईन तयार केले आहे. त्यासाठी सिडकोने ३६ कोटी रुपये खर्च केले आहेत. सिडकोच्या या १०३ हेक्टर जमिनीवरील गोल्फ कोर्सला
वन विभागाने खो घातला आणि सिडकोला २२ हेक्टर जमीन देण्यास नकार दिल्याने हा कोर्स १८ ऐवजी ११ होलचा तयार करावा लागला.
 केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एक अफलातून शॉट मारून या
गोल्फ कोर्सचे २३ डिसेंबर रोजी उद्घाटन केले. त्यावेळी पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या कोर्सचे मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आले. त्यानंतर १ जानेवारीपासून हा गोल्फ कोर्स लोकांसाठी खुला करण्यात आला, पण मेंबरशिप अद्याप ठरविण्यात न आल्याने प्रत्येक गेमसाठी ५०० रुपये व शनिवार-रविवार
७५० रुपये आकारून हा गोल्फ
कोर्स सध्या चालविला जात आहे. पावसाळा सुरू झाल्याने मात्र आता हा खेळ खेळणाऱ्या नवशिक्या खेळाडूंनीही पाठ फिरवली आहे. याच संधीचा फायदा घेऊन या गोल्फ कोर्सवर आता पाटर्य़ाचा खेळ
खेळला जात असून, त्या ठिकाणी बाहेरील खाद्यदेखील आणले जात आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांचा वापर
गोल्फ बॉलसारखा केला जात आहे. चखण्याला वडापाव आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत मद्य असा या पाटर्य़ा करणाऱ्याचा फंडा आहे. गोल्फ कोर्सचा परिसर विस्तीर्ण, हिरवागार व छोटय़ा टेकडय़ांचा असल्याने या ठिकाणी पोलीस
अथवा सर्वसामान्य नागरिक फिरकण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा गोल्फ कोर्स तळीरामांसाठी हुकमाचे ठिकाण झाले आहे. विशेष म्हणजे सुरक्षेसाठी प्रकल्पग्रस्तांना ठेवण्यात आल्याने त्यांना पटविणे सोपे जात आहे. यासर्दभात सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौधरी यांना विचारले
असता, अशा पाटर्य़ा होत असल्या तर तात्काळ कारवाई केली
जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या गोल्फ कोर्ससाठी सुरक्षा आणि व्यवस्थापन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.