नांदगाव विधानसभा मतदार संघांतर्गंत येणाऱ्या मनमाड शहर आणि परिसरांत बुधवारी झालेल्या निवडणुकीत ५५ ते ५८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानात फारसा उत्साह दिसून आला नाही. काही ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या तर काही केंद्रांवर शुकशुकाट होता. अखेरच्या टप्यात मात्र जवळपास सर्वच केंद्रांवर रांगा दिसून आल्या.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक कमालीची चुरशीची आणि ऐतिहासिक ठरली. सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि स्वबळावर रिंगणात उतरल्याने मतदान यंत्रावर यंदा सर्वच पक्षांची चिन्हे पाहून मतदार कमालीचा गोंधळून गेला. मतदारसंघात
पंकज भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस), सुहास कांदे (शिवसेना), अनिल आहेर (काँग्रेस), अद्वय हिरे (भाजप) यांच्यात मुख्य लढत आहे. मतदानाद्वारे एकूण १५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. किरकोळ अपवाद आणि बाचाबाचीचे प्रकार वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिवाय, सर्व केंद्रांवर आवश्यक त्या मुलभूत सुविधा यंदा दिसून आल्या.
मतदान प्रक्रियेसाठी शहरात एकूण ८४ मतदान केंद्र होते. त्यातील १२ मतदान केंद्र संवेदनशील होती. त्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सुरूवातीच्या एक तासात बहुतांश केंद्रांवरशुकशुकाट होता. सकाळी आठ नंतर हळूहळू मतदार येऊ लागले. कामगार वस्तीच्या मतदार केंद्रांवर सकाळी बरीच गर्दी होती. यात रेल्वे कर्मचारी व तत्सम विभागातील कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावत कामावर जाणे पसंत केले. सकाळी पहिल्या दोन तासात ८.१७ टक्के मतदान झाले. दुपारी एकपर्यंत ही टक्केवारी २३ टक्के होती. तीन वाजेपर्यंत मतदान ३८ ते ४० टक्क्यांवर पोहोचले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या परिवारासह येवून मतदानाचा हक्क बजावला. काही मतदान केंद्रावर महिला मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. नवमतदारांसह युवक युवतींनी मतदानात भाग घेतला. परंतु दुपापर्यंत सर्वत्र निरुत्साहाचे सावट दिसून आले. अनेक केंद्रात शुकशुकाट होता. ऑक्टोबर हिटचा तडाखा सकाळपासून चांगलाच जाणवत होता. वातावरणातील उष्णतेमुळे नागरिक घामाघूम झाले. त्याचाही परिणाम मतदानावर झाला. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक केंद्राच्या बाहेर मंडप टाकण्यात आले. जेथे मंडप शक्य नाही, अशा केंद्राजवळ कापडी तावदाने लावण्यात आली. काही केंद्रावर पाण्याची व्यवस्थाही होती. दुपारी तीननंतर मात्र सर्वच केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. पाचनंतर या प्रक्रियेने काहीसा वेग घेतला. सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते आणि समर्थक मतदारांना घेवून येत होते. शहरातील सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, प्राथमिक शाळा, मरेमा विद्यालय, गुरूगोविंदसिंग हायस्कुल, बुधलवाडी, प्राथमिक शाळा, मनमाड महाविद्यालय, आझाद हॉलजवळील बालवाडी केंद्र, संत बार्णबा हायस्कुल, संत झेवियर्स हायस्कुल, रेल्वे इन्स्टिटय़ुट शआळा आदी मतदान केंद्रावर सकाळी शुकशुकाट होता. कर्मचाऱ्यांना मतदारांची प्रतिक्षा करावी लागली. दुपारनंतर मात्र या सर्वच केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या.