उरण तालुक्यातील मोरा येथून डिझेल चोरी करणाऱ्या चार होडय़ांसह शेकडो लिटर डिझेल तसेच डिझेल साठवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेले प्लास्टिकचे कॅन नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी हस्तगत केले. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अरबी समुद्र तसेच उरण परिसर व जेएनपीटी बंदर विभागातही मोठय़ा प्रमाणात डिझेल, नाफ्ता, काळे तेल यांची तस्करी होत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मंगळवारच्या घटनेमुळे या परिसरात डिझेल व तेलची तस्करी करणाऱ्या माफियांचा वावर अजूनही असल्याचे उघड झाले आहे.
मुंबई व जेएनपीटी बंदराच्या दरम्यान असलेल्या अरबी समुद्रात दोन्ही बंदरात तसेच जागतिक व्यापार करणारी अनेक जहाजे तसेच मोठमोठे बार्जची वाहतूक होत असते. काही कालावधीसाठी ही मोठी जहाजे या परिसरात थांबतात. याचा फायदा घेत छोटय़ा होडय़ांच्या साहाय्याने जहाजातील लाखो लिटर डिझेल व तेलाची चोरी केली जाते. टाकीतून काढलेले डिझेल छोटय़ा प्लास्टिकच्या कॅनमध्ये किंवा होडीत तयार करण्यात आलेल्या साठवणूक टाकीत ठेवून त्याची कमी दराने विक्री करण्याचा व्यवसाय येथे जोरात सुरू असतो. या संदर्भात नवी मुंबईच्या गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. डिझेल चोरी व तस्करीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात सुरू असतानाच जेएनपीटी परिसरातील टँक फार्म परिसरातूनही मोठय़ा प्रमाणात डिझेलची चोरी करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. धुतूम परिसरातील इंडियन ऑइलच्या साठवणूक क्षेत्रातही नाफ्ता तसेच डिझेलच्या चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे जेएनपीटी बंदरातील विविध घातक वस्तूच्या बरोबरीनेच तेलजन्य पदार्थाच्या तस्करीतही वाढ झाली आहे. पुन्हा हा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उद्भवला आहे.
सध्या या परिसरात असलेल्या तेल वाहिन्यांना छिद्रे पाडून त्यातून डिझेलची चोरी करण्याचे प्रकार सुरू असल्याने या परिसरात गार्ड नेमण्यात आले आहेत. या घटनेत दीपक कोळी, साईप्रसाद कोळी, डॅनी वाल्मीकी व अक्षय वाल्मीकी या चार जणांवर अत्यावश्यक वस्तू पुरवठा व ज्वलनशील पदार्थ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नवी मुंबई गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष शिंदे व मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ ए. एस.पठाण यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.