ओझर येथील एचएएल कारखान्यात कित्येक वर्षांपासून कायमस्वरूपी कामगारांची भरती झालेली नसल्याने स्थानिक बेरोजगारांच्या आशेवर पाणी फिरत आहे. स्थानिक बेरोजगारांच्या मनातील खदखद एचएएल प्रशासनास कळावी म्हणून ओझर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली रखडलेली कायमस्वरूपी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी यांसह इतर मागण्यांचे निवेदन एचएएल व्यवस्थापनास देण्यात आले.
तांत्रिक व बिगर तांत्रिक विभागासाठी कायमस्वरूपी भरती करण्यात यावी, रद्द झालेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा शिथिल करण्यात यावी, भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, हे मुद्दे प्रामुख्याने निवेदनात मांडण्यात आले आहेत. ओझर व परिसरात सुमारे १२०० औद्योगिक तंत्रज्ञान परीक्षाप्राप्त तसेच पदविकाधारक बेरोजगार असून एचएएल कारखान्याती भरतीस विलंब होत असल्याने या बेरोजगारांचे भविष्य अंधारात आहे. ओझरच्या स्थानिक शेतकऱ्यांनी आपली जमीन एचएएलसाठी दिली आहे. आता मात्र त्यांच्या वारसांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार भरतीत स्थानिकांना न्याय मिळत नसल्याने ओझरकरांमध्ये नाराजीची भावना आहे.
२०१३ मध्ये भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतर एचएएल प्रशासनाने थोडय़ाच दिवसांत भरती करण्यात येईल, अशी माहिती दिली होती. परंतु तीन वर्षांनंतरही एचएएल प्रशासनाने भरतीसंदर्भात कोणतीही कार्यवाही सुरू केलेली नाही. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी ‘ओझर संघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली. समितीच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेकडो बेरोजगारांनी एचएएल कारखान्यावर धडक दिली. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमलेल्या बेरोजगारांना ओझर ग्रामपंचायतीचे सदस्य यतीन कदम यांनी मार्गदर्शन केले. एचएएल कारखान्यातील भरतीत स्थानिकांना न्याय देण्यासाठी आपण पाठपुरावा करत रहाणार, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. एचएएलमध्ये लवकरात लवकर कायमस्वरूपी कामगारांसाठी भरती करण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आल्याची माहितीही यतीन कदम यांनी दिली. याप्रसंगी केशवराव वाघ, राजू भडके, युवराज शेळके, राजेश तपकिरे आदी उपस्थित होते.