शहरातील जुन्या नाशिकमधील काझीगढीचा काही भाग रात्री उशिरा कोसळल्याने अनेक घरांची पडझड झाली. या घटनेत सुमारे २० जखमी झाले. भुयारी गटारीचे पाणी जमिनीत सातत्याने मुरल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
श्री संत गाडगे महाराज धर्मशाळेजवळ हा प्रकार घडला. ‘रात्री अर्धवट झोपेत असतांना अचानक धप्प असा आवाज झाला आणि काही कळण्याच्या आत आमच्यावर मातीचा ढिगारा कोसळला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले’ अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. एकीकडे संसार उघडय़ावर पडला म्हणुन आलेली हतबलता तर दुसरीकडे त्या संकटातून वाचल्याची भावना प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर दिसत होती. या घटनेला लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जबाबदार धरले असून बेघर झालेल्यांचे महापालिकेने पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. गोदावरी काठावर उंचावर असलेला काझीगढी परिसर धोकादायक आहे. पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर, येथील नागरिकांना स्थलांतर करण्याविषयी महापालिकेकडून दरवर्षी नोटीस दिली जाते. मात्र, प्रशासन नोटीस देण्याशिवाय काहीच करीत नाही, हा अनुभव असल्याने नागरीक सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. उंचीवरच्या या परिसरात गटारीचे पाणी सातत्याने मुरते. त्यामुळे गढी कोसळल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून गढी परिसरातील काही भाग खचण्यास सुरूवात झाली होती. लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या संबंधित विभागाच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे अग्निशमन विभाग तसेच पोलीस यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात येत होती. बुधवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास गढीचा भाग कोसळण्यास सुरूवात झाली. गढीच्या कथडय़ावर असलेली २० ते २५ घरे जमिनदोस्त झाल्याने अमरधाम ते मोदकेश्वर रस्ता संपुर्णत बंद झाला. पोलीस विभागाकडून वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला. झाडे व वीज खांब उन्मळून पडले.
रात्रीच्या अंधारात अग्निशमन विभागाला काम करण्यास अडथळे आले. गुरूवारी सकाळी मदतकार्याला सुरूवात झाली. कुठलीही हानी होऊ नये, तसेच लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे मदतकार्यात अडथळा येऊ नये यासाठी परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
सकाळी लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यास सुरूवात केली. गढी कोसळल्याने जे नागरीक बेघर झाले, त्यांना तात्पुरत्या स्वरूपात श्री संत गाडगेबाबा धर्मशाळा, तसेच महापालिकेच्या विद्यानिकेतन क्र. १६ मध्ये स्थलांतरीत करण्यात आले. त्यांच्या भोजनाची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी घटनास्थळी भेट दिली. नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाल्याने महापालिका आयुक्त, महापौर यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे नगरसेविका वत्सला खैरे यांनी सांगितले. पालिका प्रशासनाच्या चालढकलीमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप खैरे यांनी केला. आगामी कुंभमेळाच्या पाश्र्वभूमीवर परिसरात संरक्षण भींत बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.