यावर्षी महाराष्ट्रात पावसाअभावी मोठा दुष्काळ पडला असून सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे म्हणून बुलढाणा अर्बन संस्थेच्या कर्मचारी कल्याण निधीतून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टला एक लाख रुपयांचा धनादेश भाईजी यांचे हस्ते अजितदादा पवार यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. सहकाराची समृध्द परंपरा जतन करून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या बुलढाणा अर्बन संस्थेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली.
अजितदादा पवार शुक्रवारी एक दिवसाच्या बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी अजितदादा पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाईजी यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना अजितदादा पवार यांनी बुलढाणा अर्बन संस्थेच्या कार्याविषयी आनंद व्यक्त करून ते म्हणाले की, अलिकडच्या काळात सहकारी संस्था चालविणे अतिशय अवघड झाले आहे. त्यास ही संस्था अपवाद ठरली आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व सभासद अभिनंदनास पात्र आहेत.
बुलढाणा अर्बनच्या कार्याला दृष्ट लागू देऊ नका. भाईजींच्या दूरदृष्टीचा पुरेपूर फायदा करून घ्या, असा उपदेश केला.
 याप्रसंगी आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, शहर अध्यक्ष सुरेश कुळकर्णी, अ‍ॅड. जितेंद्र कोठारी यांच्यासह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.