मागील निवडणुकीपेक्षा सुमारे १५ टक्क्यांनी मतदान वाढल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार, याविषयी प्रत्येक जण आपआपल्या परीने अंदाज व्यक्त करत असतानाच मतदानाच्या दिवशी तसेच आदल्या रात्री शहरातील काही भागात घडलेले पैसे वाटपाचे प्रकार सर्वानाच चिंतन करावयास लावणारे आहेत. विशेष म्हणजे उमेदवारांनी आमच्यासाठी म्हणून ज्यांच्याकडे पैसे दिले, त्यांनी पुरेशी रक्कम न देता त्यातील निम्मा वाटा स्वत:कडेच ठेवल्याच्या तक्रारी काही भागातील मतदारांकडून करण्यात येत आहेत. म्हणजेच उमेदवार आणि मतदार यांच्यामधील मध्यस्थांनीच पैशांवर अधिक प्रमाणावर डल्ला मारल्याचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
निवडणुकीत मतदानासाठी पैसे वाटप होणे यात आता काहीही नवीन राहिलेले नाही. एका विशिष्ट गटातील मतदारांना पैसे घेऊन मतदान करण्यात काही वावगे आहे, असे बिलकूल वाटत नाही. उलट काहीही न करता घरबसल्या जर ३००-४०० रुपये मिळणार असतील, तर का घेऊ नयेत असा त्यांचा रोकडा सवाल. निवडणुकीमध्ये जितकी अधिक चुरस त्या प्रमाणात पैशांचे अधिक वाटप असे गणित आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रारंभी निवडणूक चुरशीची होईल काय, याविषयी अनेकांकडून शंका व्यक्त केली जात होती. प्रचाराचा एकेक दिवस कमी होत गेला तसे निवडणूक अतिशय निकराची होणार असल्याचे संकेत मिळू लागताच, पैशांची मोठी उलाढाल होण्याची चिन्हे दिसू लागली. मागील लोकसभा निवडणुकीतही नाशिकमध्ये अर्थकारण झाल्याची जोरदार चर्चा होती. या निवडणुकीत तर पैसे वाटप करणारे रंगेहाथ पोलिसांना सापडल्याने निवडणुकीत पैशांचे वाटप होते यावर शिक्कामोर्तबच झाले.
जुन्या नाशिकमधील कुंभारवाडा, नानावली या भागात मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत घरोघरी पैशांचे वाटप सुरू होते. असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. एका मतदाराच्या घरात सहा सदस्य होते. त्यांना एका मतासाठी ३०० रुपये याप्रमाणे एकूण १८०० रुपये मिळाले. आमच्या भागात खरं तर एका मतासाठी हजार रुपये देण्यात येणार होते. आम्हाला काही दिवस आधी तसेच सांगण्यात आले होते, परंतु मतदानाच्या आदल्या रात्री एका मतासाठी फक्त ३०० रुपये देण्यात आले. ज्या कोणाकडे पैसे वाटण्यासाठी देण्यात आले असतील, त्याने हजार रुपये न देता फक्त ३०० रुपयांवर मतदारांची बोळवण करून ७०० रुपये स्वत:च्या खिशात घातले असावेत. असे म्हणणे एका वयोवृद्धेने मांडले. ज्या उमेदवाराला मत देण्यासाठी म्हणून आम्हाला पैसे देण्यात आले होते. त्याला मत न देता आमच्या घरातील सर्व सदस्यांनी दुसऱ्या उमेदवाराला मत दिल्याची कबुलीही या महिलेने दिली. या भागात असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडले. आमच्यापर्यंत जास्त पैसे येणे गरजेचे असताना मध्यस्थांनी ते येऊ दिले नाहीत. परस्पर त्यांच्यावर डल्ला मारल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. काही झोपडपट्टय़ांमध्ये तर दुपापर्यंत पैसेच न पोहोचल्याने मतदार बाहेर पडत नसल्याचे दिसून आले. मतदान संपण्यास शेवटचे दोन तास बाकी असताना काही ठिकाणी अशा मतदारांशी उमेदवारांच्या दूतांमार्फत ‘सौहार्दपूर्ण’ बोलणी झाल्यानंतर लोंढेच्या लोंढे मतदान केंद्रावर गर्दी करू लागले. मागील लोकसभा निवडणुकीतही भालेकर हायस्कूलमधील मतदान केंद्रात शेवटच्या अध्र्या तासात मतदारांचा असाच लोंढा आला होता. त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादविवाद झाले होते. या निवडणुकीतही शेवटी मोठय़ा संख्येने मतदार भालेकर केंद्रात येण्यास सुरुवात झाली होती, परंतु हे केंद्र संवेदनशील ठरविले गेले असल्यामुळे बंदोबस्त मोठय़ा प्रमाणावर होता. बरोबर सहा वाजता दरवाजा बंद करण्यात आल्याने कोणताही वाद होण्यास निमित्तच उरले नाही. काही उमेदवारांनी जुन्या नाशिकमध्ये पैसे वाटपासाठी जी यंत्रणा उभी केली होती, त्यापैकी काही जण पोलिसांना रंगेहाथ सापडल्याने त्यांची यंत्रणाच कोसळली. त्याचा परिणाम पैसा येईल या आशेने जे मतदार थांबले होते, त्यांच्यावर झाला. जुन्या नाशकात मतदानाच्या टक्केवारीची जी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, ती पूर्ण न होण्यामागील हेही एक कारण होय. काँग्रेसचा माजी नगरसेवकच पैसे वाटप करताना पोलिसांना आढळून आल्याने इतर पदाधिकारीही सावध झाले. काही जणांनी त्या परिसरातून काढता पाय घेतला.