टवटवीतपणा हा फुलांचा अंगभूत गुण. मग ते फूल कोणतेही असो. नुसते पाहिले तरी मन प्रसन्न होऊन जाते. निसर्गाने रंग, रूप, गंध, आकार या सगळ्यांची मुक्तहस्ते कोठे उधळण केली असेल, तर ती फुलांमध्ये. या फुलांशी नाते सांगणाऱ्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन शहरात करण्यात आले आहे.
उपवने व उद्याने विभागाच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आवारात ३५ व्या वार्षिक पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे हेमंत पगारे यांच्या हस्ते झाले. उपवने व उद्यान विभागाचे संचालक बी. व्ही. कोपुलवार, सहायक संचालक जे. व्ही. चौघुले, डी. के. पवार, व्ही. जी. रावळ, डी. एस. कचरे, एच. व्ही. नेऱ्हे आदी या वेळी उपस्थित होते. प्रदर्शनात गुलाब पुष्प, मौसमी व बहुवर्षीय फुले, शोभिवंत झाडे, कॅक्टस, सॅक्युलट, लँडस्केप, पुष्परचना, रांगोळी स्पर्धेत ६५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रदर्शन उद्या (रविवारी) सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नागरिकांना खुले राहणार आहे.