राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला अर्थनीती परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला. या परिषदेत सहभागी महिलांनी आर्थिक साक्षर होण्याचा परिचय करून दिला. याप्रसंगी उपस्थित विचारवंतांनी त्यांच्या विविधांगी शोषणाविरुद्ध व्यवस्थेशी बंड करण्यासोबत पर्यायी आर्थिक व्यवस्था उभारावी लागेल, असा सूर आळवला.
संघटनेच्या अध्यक्ष छाया खोब्रागडे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या या परिषदेचे उद्घाटन सामूहिक त्रिसरण पंचशीलेच्या उच्चारात ऑस्ट्रेलियातील बौद्ध भिक्खुणी बोधीचित्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. प्रमुख पाहुणे म्हणून तामिळनाडूतील ज्येष्ठ सनदी अधिकारी पी. सिवाकामी, दिल्लीतील ज्येष्ठ आंबेडकरी महिला नेत्या व साहित्यिक रजनी टिळक, सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी किशोर गजभिये, स्त्रीवादी लेखिका हैदराबादच्या लता प्र.म., नंदूरबारमध्ये आदिवासींमध्ये काम करणाऱ्या प्रतिभा शिंदे, वर्धेच्या नूतन माळवी आणि संघटनेच्या जिल्हाध्यक्ष हंसा नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते.
पी. सिवाकामी व किशोर गजभिये यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीचा उपयोग दलित आदिवासींच्या विकासासाठी प्रामाणिकपणे होत नसल्याची टीका केली. सिवाकामी म्हणाल्या, सरकारी तिजोरीत जमा होणारा बहुजनांचा वाटा सर्वाधिक असताना त्यातील फक्त ४० टक्के निधी विकासावर खर्च होतो. उर्वरित निधी इतरत्र वळवला जातो. सुनील खोब्रागडे यांनी दलितांना शोषणातून मुक्त व्हायचे असेल तर स्वत: पुढाकार घेऊन समांतर अर्थव्यवस्था उभारावी, असे कळकळीचे आवाहन केले. दलित महिलांच्या शोषणाला जबाबदार असलेल्या शासकीय धोरणाला महिलांनी विरोध करावा, असे आवाहन  मिलिंद फुलझेले यांनी केले. यावेळी रजनी टिळक, लता, नूतन माळवी, प्रतिभा शिंदे आदींची भाषणे झाली.
हरयाणातील मानवाधिकार कार्यकर्त्यां मनीषा देवी यांना प्रियंका भोतमांगे स्मृती अस्मिता पुरस्कार तर नागपुरातील कस्तुबा नगरातील महिला मंडळाला फुलनदेवी स्मृती शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप होते. मेंदूरोग तज्ज्ञ संजय रामटेके आणि विलास गजभिये यांनी हे दोन्ही पुरस्कार प्रायोजित केले होते. हरयाणात दलित महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती कथन करून राज्यातील काँग्रेस शासन दोषींची पाठराखण करीत असल्याचा मनीषा देवी यांनी आरोप केला. संचालन कविता खोब्रागडे यांनी केले. संघटनेच्या जिल्हाध्यक्ष हंसा नारनवरे यांनी प्रास्ताविक केले. अर्चना गडपायले यांनी आभार मानले. वर्षां धारगावे, संध्या मोरे, प्रणोती डहाट, वंदना पेटकर, अर्चना गडपायले, कुमुदिनी नंदेश्वर आणि ममता ढोके आदींचे यावेळी सहकार्य लाभले.