ज्येष्ठ साहित्यिक आणि ओजस्वी वक्तृत्वामुळे मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे प्राचार्य राम शेवाळकर यांच्या यांची स्मृती कायम जपण्यासाठी अत्याधुनिक  सांस्कृतिक व साहित्य संकुल उभारण्यासाठी नागपूर शहरात तात्काळ जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली.
नागपूर सुधार प्रन्यासतर्फे राम शेवाळकर स्मृती प्रतिष्ठानाच्या प्रस्तावित संकुलासंदर्भात आर.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. साहित्य व सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी नागपुरात किमान एक किंवा दोन एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका किंवा महसूल विभागामार्फत उपलब्ध असलेल्या जागेचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या. मुंबईच्या पु,ल. अकादमीच्या धर्तीवर या संकुलाची निर्मिती व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे, त्यादृष्टीने तसा आराखडा तयार करावा. या संकुलामध्ये सुसज्ज संदर्भ ग्रंथालय, साहित्य, संगीत, आदी विषयाचे स्वतंत्र दालन, साहित्यिक उपक्रमासाठी सभागृह व स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्या महत्त्वपूर्ण व्यक्तीची भाषणे झाली त्या भाषणांचे संकलन या ठिकाणी उपलब्ध राहील अशी सोय करण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या.
राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकुल उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार शासनातर्फे या संदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. प्रारंभी राम शेवाळकर स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक व साहित्य संकुल निर्मितीची संकल्पना बैठकीत मांडली. नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे म्हणाले, साहित्य व सांस्कृतिक संकुल अत्याधुनिक असावे तसेच यामध्ये साहित्य व विविध कलांसाठी स्वतंत्र दालनाची निर्मितीच्या दृष्टीने लवकरच आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्यात येईल. बैठकीला पोलीस आयुक्त के.के. पाठक, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अधीक्षक अभियंता एस.एच. गुज्जलवार, आशुतोष शेवाळकर आणि नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी उपस्थित होते.