एक हजार रुपयांच्या २७ बनावट नोटा व्यवहारात आणण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्या प्रकरणी या नोटांसह एका परप्रांतीय संशयितास शहर पोलिसांनी अटक केली. या संशयितास सोमवारी येवल्यातही फिरताना पाहिले गेले होते.
आठवडय़ापासून ही व्यक्ती मनमाडमध्ये वावरत असल्याने एक हजार रुपयांच्या काही बनावट नोटा व्यवहारातही आल्या असण्याची भीती व्यक्त होत आहे. मगरब शेख इमाम शेख (४२, रा. नबीनगर, कलीमाछ, जि. मालंदा, पश्चिम बंगाल) असे आपले नाव असल्याचे या संशयिताने पोलिसांना सांगितले. एक संशयित बनावट नोटा व्यवहारात आणत असल्याची माहिती मनमाड विभागाचे पोलीस अधीक्षक समाधान पवार यांना मिळाल्यावर त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांच्या पथकाने शहरातील एका लॉजवर जावून संबधिताची चौकशी केली. संशयित आढळून आल्यावर त्याच्याजवळ २७ हजार रुपयांच्या एक हजार रुपयांच्या २७ बनावट नोटा मिळून आल्या. अधिक चौकशीअंती ही व्यक्ती आठ दिवसांपासून मनमाडला वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
याशिवाय त्याने आपल्या गावाहून येताना सोबत एक हजार रुपयांच्या १०० म्हणजे एक लाख रुपये आणल्याचे समजले. त्यापैकी २७ नोटा पोलिसांना मिळाल्या असल्या तरी इतर नोटा व्यवहारात आणल्या गेल्या की काय, या शक्यतेने पोलिसांची झोप उडाली आहे. ११ हजार ३०० रुपयांचे खरे चलनही त्याच्याकडे मिळून आले.
मनमाडमध्ये बनावट नोटांचे लोण आल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. एक हजार रुपयांच्या बनावट नोटा प्रामुख्याने रविवार बाजाराच्या दिवशी चलनात आणण्याचे प्रकार घडतात. या पाश्र्वभूमीवर दुकानदार व व्यापाऱ्यांनी एक हजार रूपयाची नोट घेताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.