महागाई आणि दुष्काळाचे सावट असतानाही, वर्षप्रतिपदेचा सण आज महानगरात पारंपरिक उत्साहाने पार पडला. घरोघरी उभारलेल्या गुढय़ा-तोरणे, रस्तोरस्ती रंगलेल्या रांगोळ्या, हिंदू संस्कृतीचे ‘मानचिन्ह’ मानला जाणारा ‘भगवा’ फडकवत जागोजागी निघालेल्या शोभायात्रा आणि मिरवणुका, पारंपरिकरीत्या होणारी खरेदी आणि सुट्टीच्या आनंदात पडलेली पक्वान्नांच्या भोजनाची भर यांमुळे पाडव्याचा आजचा दिवस खऱ्या अर्थाने गोड झाला.. पाडव्याच्या मुहूर्त साधून कुवतीनुसार खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी केली. घरे, वाहने, सोने-चांदी आणि कपडय़ांच्या पारंपरिक खरेदीबरोबरच, नव्या जमान्याची ओळख घडविणाऱ्या मोबाईल, संगणकासारख्या पाहुण्यांचेही आज असंख्य घरांत उत्साहाने स्वागत झाले.
एरवी चढे असणारे सोन्याचे दर सध्या तुलनेत कमी असल्याने हा सुवर्णयोग साधत ग्राहकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला पसंती दिल्याने सराफ बाजारासाठी गुरुवारचा गुढीपाडवा सर्वात शुभ ठरला. गृहकर्ज स्वस्त झाल्याचा परिणाम म्हणून प्रकल्पांच्या चौकशीबाबत ग्राहकांनी उत्सुकता दाखवण्यास सुरुवात केली असून ताबा घेता येतील अशी बांधून तयार झालेली घरे वा बांधकाम संपत आलेल्या घरांबाबत लोकांनी अधिक रस दाखवल्याचे दिसून आले. वाहन खरेदीसाठी ग्राहक फारसे उत्सुक नसल्याने गुढीपाडव्याचा मुहूर्त वाहन उद्योगाला तारू शकला नाही.
भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा हा शुभमुहूर्त असल्याने या दिवशी नवीन खरेदी, गुंतवणुकीचे व्यवहार करण्यात ग्राहकांना रस असतो. त्यामुळे सराफ बाजार, वाहनांची बाजारपेठ आणि गृहनिर्माण क्षेत्र या तिन्ही उद्योगांचे डोळे गुढीपाडव्याच्या मुहूर्ताकडे लागले होते. त्यासाठी आठवडाभरापासून दागिन्यांच्या घडणावळीवर सवलत, वाहनांच्या दरात घाऊक सवलत, घरखरेदीवर नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क सवलत वा बक्षिसांची लयलूट अशी जाहिरातबाजी-फलकबाजी मुंबई महानगर प्रदेशात सर्वत्र दिसत होती.
सोन्याच्या दरात सध्या थोडे स्थैर्य असल्याने तुलनेत दर कमी आहेत. नेमक्या याच गोष्टीचा फायदा सराफ बाजाराला मिळाला. सोन्याच्या दरातील या स्थैर्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीचे ‘शुभ’कार्य करण्यासाठी ग्राहकांनी मोठय़ा संख्येने सराफ दुकानांमध्ये गर्दी केली. दागिन्यांपेक्षा वळे-सोन्याची नाणी घेण्याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत होता. सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी सुमारे २९ हजार ५०० रुपये असा होता. गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या तुलनेत तो जवळपास दहा टक्क्यांनी जास्त आहे. पण गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या सोन्याचे दर कमी असल्याने ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीत रस घेतला. त्यामुळे सराफ बाजारात सोनेखरेदीची गुढी दिसली. चांदीच्या खरेदीबाबत फारसे व्यवहार झाले नाहीत, असे सराफ दुकानदारांनी सांगितले.
वाहन उद्योगातील मंदीचे वातावरण हटण्याची मात्र चिन्हे नाहीत. गुढीपाडव्याचा मुहूर्तही त्यासाठी मदत करू शकला नाही. मार्चमध्ये वाहन कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत कारखरेदीवर २५ हजार ते ७५ हजारांपर्यंतच्या सवलती दिल्या होत्या. पण त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने सवलतीचा कालावधी वाढवण्यात आला. गुढीपाडव्यालाही म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याने एप्रिल अखेपर्यंत सवलतीचा कालावधी वाढवण्यात आल्याचे, या क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. आज जवळपास ४००-४५० ग्राहकांनी नवी वाहने घरोघरी नेल्याचे साईच्या कॉर्पोरेट सेल्स विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक केदार कुलकर्णी यांनी सांगितले. परिवहन विभागाच्या अंधेरी येथील पश्चिम उपनगर प्रादेशिक विभाग कार्यालयामध्येही वाहनांचे कर भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
गृहनिर्माण क्षेत्रासाठी गुढीपाडवा सोन्यासारखी झळाळी आणणारा नसला तरी उत्साह वाढवणारा ठरणारा. गेल्या काही महिन्यांत आलेली मरगळ दूर होऊन ग्राहक तयार घरांबाबत रस दाखवत असल्याचे दिसून आले. ‘एमसीएचआय’च्या प्रदर्शनालाही ग्राहकांनी गर्दी केली, तेथील विविध प्रकल्पांच्या स्टॉलवर ग्राहक खरेदीच्या दृष्टीने चौकशी करत होते. त्यातही ताबा लगेचच मिळेल वा बांधकाम अंतिम टप्प्यात आलेल्या प्रकल्पांतील घरांबाबत लोक अधिक उत्सुक असल्याचे दिसून आले. या वातावरणामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना थोडा उत्साह आल्याचे बांधकाम व्यावसायिक मोहन देशमुख यांनी सांगितले.