शिक्षा झालेल्या व नंतर पॅरोले रजेवर सुटून विहित मुदतीत हजर न होणाऱ्या आरोपीकडून एका जबाबदार पोलीस निरीक्षकाची पत्नी व पुत्राने जमीन खरेदी केली! पॅरोलवर सुटलेल्यांपकी अनेक आरोपी हजर होत नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली असताना, फरारी आरोपी व पोलिसांमधील ‘अर्थ’पूर्ण संबंध याप्रकारे उघड झाल्याने चांगलीच खळबळ उडाली.
नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथे काही वर्षांपूर्वी दुहेरी हत्याकांड घडले होते. या हत्येतल्या सर्व आरोपींना नांदेडच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यातील ९ आरोपी पॅरोल रजेवर सुटले होते. पॅरोल रजेवर कारागृहाबाहेर पडल्यानंतर हे सर्व आरोपी पुन्हा कारागृहात हजर झाले नाहीत. पॅरोलवर सुटून विहित मुदतीत कारागृहात न परतणाऱ्या फरारी आरोपींच्या अटकेबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. नांदेडातही असे १७ आरोपी शिक्षेनंतर फरारी आहेत.
दोन महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी या फरारी आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक देवीदास ढोले यांना पत्र पाठवून सत्वर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. नांदेडलगतच्या पुणेगावमधील नऊ आरोपी फरारी असल्याचे लक्षात आल्यानंतर इतवारा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या पथकाने विशेष मोहीम सुरू केली होती. कारागृहातून पसार झालेले आरोपी कुठे आहेत, कोणाच्या संपर्कात आहेत, त्यांना कोणाचे सहकार्य आहे, याचा शोध सुरू केला. नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गजानन पुयड याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीने अनेक अधिकारी सर्द झाले.
फरारी आरोपींना सिडको पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभय होते, असे निष्पन्न झाले. खूनप्रकरणी जन्मठेप झालेला व सध्या फरारी असलेला काशिनाथ पुयड याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ढोले यांची पत्नी संगीता व पुत्र आशिष यांनी जमीन खरेदी केल्याची माहिती पोलिसांना कळाली. तशी कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. कागदपत्रे हाती लागल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अवाक झाले. चार वेगवेगळय़ा जमिनीची दस्तनोंदणी त्यांना आढळून आली. या चारही नोंदणीत ढोले यांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. ढोले यांनी खरेदी केलेल्या जमिनीबाबत आता स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. देशमुख यांनी यास दुजोरा दिला. मात्र, अधिक बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, गजानन पुयड याला फरारी असतानाच्या काळात मदत करणाऱ्या बळीराम मारोती पुयड, विठ्ठल पुयड, रुक्मिणीबाई पुयड, सुनील पुयड, शिवानंद पुयड, श्यामाबाई मुंगल यांच्याविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या पथकाने केलेल्या कारवाईने मात्र खळबळ उडाली. फरारी आरोपी व पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध यामुळे चव्हाटय़ावर आले आहेत. या प्रकरणात फरारी आरोपीकडून पसे घेणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.