जिल्हा न्यायालयातील वाहन तळावर प्रवेश करण्यासाठी वाहनधारक पास नसतानाही धडपड करत असल्याने मध्यवर्ती भागातील रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. न्यायालयातील वाहनतळ नाशिक बार असोसिएशनच्या सदस्यांसाठी राखीव करण्यात आला आहे. त्याची माहिती नसलेले वाहनधारक चारचाकी वाहनांमधून प्रवेशद्वारावर येतात. आतमध्ये जाण्यासाठी धडपड करतात. परिणामी, मुख्य रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या अशा वाहनधारकांमुळे सीबीएसकडून येणारी वाहतूक विस्कळीत होते. त्यात या परिसरातील ‘पे अॅण्ड पार्क’ वाहनतळावरही अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याने कोंडीत भर पडते. या पाश्र्वभूमीवर, वाहतूक पोलीस शाखेनेही अशा वाहनधारकांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
जिल्हा न्यायालयाच्या आवारातील वाहनतळ हा वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरला आहे. या ठिकाणी इतरत्र कामकाजासाठी येणारी मंडळी वाहने उभी करत असल्याने वकिलांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यावर तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी नाशिक बार असोसिएशनने वाहनतळ केवळ वकिलांच्या वाहनांसाठी राखीव ठेवण्याचे निश्चित केले. त्यानुसार असोसिएशनने सदस्यांकडून महिनाकाठी काही विशिष्ट शुल्क आकारून पास दिले आहेत. हे पास ज्या वाहनधारकांकडे आहेत, त्यांना या वाहनतळावर प्रवेश दिला जातो. पास नसलेल्या वाहनधारकांनी आतमध्ये प्रवेश करू नये म्हणून प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना याबाबत माहिती नाही, ते आपली वाहने आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रवेशद्वारावर रोखले जाते. त्यावेळी ते सुरक्षारक्षकांशी वाद घालण्याचा वा मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे काही काळ संबंधितांचे वाहन रस्त्यात उभे राहते.
मध्यवर्ती बसस्थानक, शाळा व महाविद्यालय, न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालय यामुळे या परिसरात वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. त्यात अशी काही वाहने रस्त्यात उभी राहत असल्याने सीबीएसकडून मेहेर सिग्नलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत होते. सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या काळात अनेकदा हे प्रकार घडत असल्याने या रस्यावरून मार्गस्थ होणारे वाहनधारक त्रस्त झाले आहे. या शिवाय रस्त्यालगत ‘पे अॅण्ड पार्क’ वर वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. या पाश्र्वभूमीवर, अशा वाहनधारकांविरोधात कारवाई केली जात असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी सांगितले. न्यायालयातील वाहनतळासाठी उपलब्ध जागा आणि वकिलांच्या वाहनांची संख्या यांचा ताळमेळ बसत नाही. म्हणजे कोणी सकाळी तळावर वाहन उभे केले तर त्याला सायंकाळशिवाय ते काढताच येत नाही, अशी प्रतिक्रिया अॅड. पवन चंद्रात्रे यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या आवारात वकील व पक्षकार या दोन्ही घटकांसाठी वाहनतळाची समान गरज आहे. त्यामुळे या परिसरात बहुमजली वाहनतळाचा विचार करून जागेची अडचण सोडविता येईल, असेही अॅड. चंद्रात्रे यांनी सुचविले. या संदर्भात असोसिएशनच्या अध्यक्षांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.