वैद्यकीय उपचारांमधील त्रुटी दूर व्हायला हव्या असतील तर रुग्णांनीही सज्ञान होणे आवश्यक आहे. आजार, औषधे, उपचार पद्धती व औषधांच्या साइड इफेक्ट्सविषयी माहिती मिळवल्यास उपचारांचा प्रभाव अधिक वाढवता येऊ शकतो, असे मत डॉ. निखिल दातार यांनी व्यक्त केले. नानावटी महिला महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या रुग्ण सुरक्षा संवादात उपस्थितांच्या वैद्यकीय उपचारांविषयीच्या विविध शंकांचे त्यांनी निरसन केले.
वैद्यकीय उपचारांमधील त्रुटींमध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पेशंट व त्यांचे नातलग यांच्यातील संवादाचा अभाव कारणीभूत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. डॉक्टरांची वैद्यकीय भाषा समजण्यास अडचणी येतात, असे रुग्णांना वाटते तर रुग्णांना शरीराविषयी किंवा त्यांच्या समस्येविषयी प्राथमिक स्वरूपाचीही माहिती नसते, असे डॉक्टरांना जाणवते. डॉक्टरांनी अधिकाधिक सोप्या भाषेत रुग्णांशी संवाद साधायला हवा. त्याचवेळी रुग्णांनीही त्यांच्या आजाराविषयी अज्ञानात राहून उपयोगाचे नाही, असे दातार म्हणाले. डॉक्टरांवर विश्वास ठेवणे आवश्यक असते, पण उपचारांमध्ये रुग्णांचीही जबाबदारी आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही संकेतस्थळांवर माहिती घेऊ नये. त्यात अनेकदा संशोधन न करता किंवा एकाचाच अनुभव असतो.   डॉक्टरांना नेमके प्रश्न विचारून आजाराची योग्य माहिती करून घ्यावी. त्यावरील उपचार पद्धती, शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या तपासणी, त्या तपासणींचे कारण या विषयी माहिती विचारून घ्यावी. डॉक्टरांकडे असलेला मर्यादित वेळ लक्षात घेता वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या परिचारिका तसेच प्रयोगशाळा साहाय्यकाकडूनही मदत घेता येईल. औषधांची नावे समजली नसल्यास किंवा त्यांचे प्रमाण व ते घेण्याच्या वेळा या विषयी माहिती करून घ्यावी. डॉक्टरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकल्यास, योग्य प्रश्न विचारल्यास व उपचारांची माहिती घेत राहिल्यास उपचारांमधील त्रुटी कमी होण्यास मदत होईल. डॉक्टरांनीही त्यांच्या बाजूने अधिकाधिक सतर्क राहणे आवश्यक आहे, असे डॉ. दातार यांनी सांगितले. या संदर्भात अधिक माहितीसाठी  info@patientsafteyalliance.in या मेल आयडीवर संपर्क साधता येईल.