विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयाच्या प्रांगणात १२ ते १४ जानेवारी या कालावधीत एकूण चार सत्रात होणाऱ्या हृदयेश फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांना ‘सूर-अनंत’ या विशेष अल्बमची भेट मिळणार आहे. हा महोत्सव‘लोकसत्ता’ आणि ‘रिचा रिअल्टर’ यांनी प्रस्तुत केला असून तो हाऊसफुल झाला आहे.
या महोत्सवात भविष्यात नव्या पिढीतील दर्जेदार कलाकारांना सहभागी होता यावे, या हेतूने हृदयेश आर्ट्सतर्फे सहा वर्षांपासून ‘गानप्रभा महोत्सव’ आयोजित करण्यात येतो. नुकत्याच झालेल्या या महोत्सवात पं. रघुनंदन पणशीकर (गायन), रूपक कुलकर्णी (बासरी), धनंजय हेगडे (गायन) आणि स्वीकार कट्टी (सतार) या नव्या जुन्या कलाकारांनी कला सादर केली होती. या कलाकारांच्या सादरीकरणाची स्वतंत्र सीडी काढण्यात आली असून त्याचा एकत्रित संच ‘रिचा रिअल्टर्स’तर्फे हृदयेश फेस्टिव्हलच्या प्रेक्षकांना विनामूल्य वितरित करण्यात येणार आहे. स्वखर्चाने अल्बम काढणे नवोदित कलाकारांना कठीण असल्याने रिचा रिअल्टर्सतर्फे ‘सूर-अनंत’ या शीर्षकांतर्गत काढण्यात आलेला हा अल्बम रसिकांसाठी नववर्षांची विशेष भेट ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.