धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी लोकसभेत ठाम भूमिका मांडावी, असा आग्रह धरण्यासाठी महाराष्ट्र धनगर समाज समितीच्या वतीने राज्यातील सर्व खासदारांच्या घरासमोर शनिवारी (दि. १ डिसेंबर) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
धनगर समाज अनुसूचित जमातीत असूनही हा समाज अजूनही या सवलतींपासून वंचित आहे. अनेक वर्षांपासून राज्यातील धनगर समाज या सवलती मिळाव्यात, म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहे. परंतु राज्यकर्ते याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. धनगर समाजाच्या मतावर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना या समाजाच्या प्रश्नासाठी काहीच बोलायचे नाही, असाच अनुभव आतापर्यंत आला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात. लोकसभेत ठाम भूमिका मांडावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. परभणीचे खासदार अॅड. गणेश दुधगावकर यांच्या पोखर्णी येथील घरासमोर हे आंदोलन होणार आहे. आंदोलनात धनगर समाजाने मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. शिवाजी दळणर आदींनी केले आहे.