बाजार समितीने कांदा लिलाव शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील नवीन बाजार समितीत स्थलांतरीत केल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनसेच्यावतीने पुकारलेल्या बंदमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होत आपले व्यवहार बंद ठेवले.
कांदा व टोमॅटोचे लिलाव शहरापासून दूर सुरू केल्यामुळे पिंपळगाव शहरातील बाजारपेठ ओस पडली असून स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांना नाहक सात किलोमीटर अंतर जावे लागते. त्याचाही वेळ वाया जातो. वाहतूक खर्च वाढतो. याची दखल घेऊन व शहरातील व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मनसेने हा बंद पुकारला. बाजार समितीने तातडीने कांदा लिलाव जुन्या बाजार आवारात सुरू करावे अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत बंद पुकारला जाईल आणि कांद्याचे लिलाव बंद पाडण्याचा इशारा प्रकाश गोसावी यांनी दिला.
यावेळी मनसेचे नेते सुभाष होळकर, शहरप्रमुख संजय मोरे, शिवमूर्ती खडके, बाळासाहेब आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात निषेध मोर्चा काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पिंपळगाव बाजार समितीतील उलाढालीवर शहरातील बाजारपेठ अवलंबून आहे.
मागील हंगामापासून बाजार समितीने टोमॅटोचे लिलाव नवीन जागेत स्थलांतरीत केल्यामुळे शहरातील बाजारपेठेवर विपरित परिणाम झाला आहे. शहरातील बाजारपेठ अक्षरश: ओस पडल्याने व्यापारी वर्ग धास्तावला आहे. या आंदोलनाची दखल घेऊन उपरोक्त लिलाव पुन्हा जुन्या जागेत सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली.