विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून तसेच प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती होत असताना प्रचाराच्या धामधुमीतही उमेदवारांकडून मतदानाच्या दिवशी आपआपल्या बालेकिल्ल्यातील मतदार मतदानासाठी बाहेर कसे पडतील, याचे नियोजन केले जात आहे. प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांमुळे वातावरण निर्मितीस मदत होत असली तरी मतदानाच्या दिवशी योग्य नियोजन नसल्यास त्याचा फटका निकालात बसू शकतो. याची जाणीव असल्याने सर्वच प्रमुख उमेदवारांनी आपल्या खास कार्यकर्त्यांवर त्या दिवसाच्या तयारीची जबाबदारी सोपविली आहे.
मतदानाच्या कमी किंवा अधिक टक्केवारीचा कोणत्या उमेदवारास लाभ होऊ शकतो, याचे ठोकताळे अनेकांकडून बांधले जातात.  लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी या दोन मतदारसंघांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत सुमारे १५ टक्क्यांनी अधिक मतदान झाल्यावर ते विरोधकांच्या पथ्थ्यावर पडेल असा अंदाज बहुतेक सर्वानी व्यक्त केला होता. निकालही त्याप्रमाणेच लागला. मतदानाची टक्केवारी कमी राहिल्यास निश्चित कोणताही अंदाज वर्तविणे अवघड ठरते. या पाश्र्वभूमीवर आपआपल्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक वाढण्याकडे उमेदवार लक्ष देऊ लागले आहेत. प्रचाराच्या कालावधीत काढण्यात येणाऱ्या फेऱ्यांमध्ये किंवा सभांना प्रचंड उपस्थिती असली तरी मतदानामध्ये गर्दीचे प्रतिबिंब उमटेलच असे नसते. हे लक्षात घेऊन नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या मतदार संघांमधील उमेदवारांनी मतदान अधिक होण्यासाठी आखणी करण्यास सुरूवात केली आहे. नाशिक मध्य या मतदार संघातील एका प्रमुख उमेदवाराने त्यांना अनुकूल असलेल्या भागातील एकूण मतदार..अपार्टमेंट व सोसायटय़ांची संख्या..कोणत्या अपार्टमेंटमध्ये अधिक मतदार..मतदानाच्या दिवशी गावी जाणाऱ्यांची संख्या..मतदारांनी त्या दिवशी मतदान केल्यावरच गावी जावे यासाठी विनवणी..अशी सर्व यंत्रणा तयार ठेवली आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांची फळीच त्यासाठी कार्यरत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आपल्या भागातील झोपडपट्टय़ांमधील मतदारांना इतर उमेदवारांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून काही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये, यासाठी ‘देखरेख’ व्यवस्थाही तयार करण्यात आली आहे.
नाशिक पूर्व या मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही भाग समाविष्ट आहेत. शहरी भागापेक्षा मळे भागातील मतदारांना घराबाहेर काढणे उमेदवारांसाठी एक दिव्य असते. राजकारण्यांविषयी असणाऱ्या नाराजीचा आणि निवडून आल्यावर कोणीही आपल्याकडे ढुंकूनही पाहात नाही, ही भावना त्यासाठी अधिक कारणीभूत. त्यातच यावेळी दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर मतदान होत असल्याने दीपावलीच्या तयारीचे कारण शेतकऱ्यांकडून पुढे करण्यात येणार असल्याची दाट शक्यता असल्याने मळे भागातील मतदारांशी नेहमीचे संबंध असलेल्या कार्यकर्त्यांवर त्यांची जबाबदारी टाकण्यात येत आहे. मळे भागातील सर्व मतदार विखुरलेल्या स्वरूपात राहात असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असली तरी मतदानाच्या दिवशी कोणत्या मळ्यातील वस्तीवर असलेल्यांचे मतदान झाले किंवा नाही, याची नोंद ठेवणे शहरी भागापेक्षा सुलभ असते. नाशिक पश्चिम हा बहुसंख्य मतदार हे कामगार असलेला मतदारसंघ. मतदानाच्या दिवशी कंपन्यांकडून सुटी देण्यात येत असल्याने या सुटीचा फायदा उठवित कामगारांनी गावी जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना तसेच उमेदवारांना विनवणी करणे भाग पडत आहे.