देव्हाऱ्यात कलशामध्ये ठेवलेल्या श्रीफळाला कोंब फुटल्यावर तो गावी नेण्यासाठी म्हणून बाजूला काढला जातो. गावी नेण्यापूर्वी काही महिने तो मोठय़ा भांडय़ातील पाण्यात ठेवला जातो. अनेक घरांत अशा प्रकारे नारळ ठेवलेल्या भांडय़ांमध्ये डेंग्यूचे डास दिसून आले आहेत. हे पाणी वारंवार बदलल्यास त्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणार नाही, अशी सूचना पालिका अधिकाऱ्यांनी केली आहे.
डेंग्यू फैलावणाऱ्या डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणारे छपरावरील प्लास्टिक काढून टाकण्याची मोहीम आता पालिकेनेच हाती घेतली आहे. वांद्रे आणि दादर पूर्व भागात केलेल्या कारवाईत झोपडपट्टी तसेच दुकानांवरील तब्बल दोन ट्रक भरून प्लास्टिक (टार्पोलिन) काढून टाकण्यात आले. त्याच वेळी डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थाने कायम ठेवणाऱ्या टॉवरवरही कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे.
यावर्षी डेंग्यूमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू झालेल्या पावसाने विषाणूसंसर्गाचा धोका वाढल्याने पालिकेने कारवाई तीव्र केली आहे. डेंग्यू डासांची उत्पत्ती कोणत्याही प्रकारे साठलेल्या किंवा साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असली तरी पावसासाठी घालण्यात आलेल्या प्लास्टिकच्या कागदावर पाणी साठण्याचा सर्वात जास्त धोका लक्षात घेऊन पालिकने ही कारवाई केली आहे. प्लास्टिक उडून जाऊन नये म्हणून त्यावर ठेवण्यात येणाऱ्या टायर तसेच डब्यांमध्येही पाणी साठून राहते. वारंवार विनंती करूनही हे प्लास्टिक काढले जात नसल्याने दादर पूर्वेकडील ट्रॅव्हल कंपन्यांच्या दुकानांवरील प्लास्टिक पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच काढले, अशी माहिती कीटकनाशक अधिकारी आर. नािरग्रेकर यांनी दिली. वांद्रे पूर्व, दादर या भागांत डेंग्यूचे चार ते पाच रुग्ण आढळले, त्यामुळे या विभागावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.
स्वच्छ मुंबई अभियान
डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात. त्यामुळे कचरा, दरुगधी यांच्याशी डेंग्यूचा संबंध येत नाही, मात्र डेंग्यू किंवा मलेरियासंबंधी जागृती करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना झोपडपट्टीतून कचरा, नालेसफाई, रस्त्यावरचे खड्डे यांच्याविषयी ऐकून घ्यावे लागते. त्यामुळे आता वस्तीत डेंग्यूबद्दल जागृती आणि कारवाई करताना साफसफाई मोहीमही हाती घेतली जात आहे. वांद्रे येथील एका वस्तीत गेल्या आठवडय़ात तब्बल पालिकेडून ५१६ कर्मचाऱ्यांचे पथक गेले होते. रस्त्यावरील खड्डे बुजवणे, कचरा साफ करणे, ताडपत्री काढणे, पाण्यात कीटकनाशक फवारणे, आजाराची माहिती देणे असे सर्व उपक्रम एकत्र करण्यात आले होते.
डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थाने आढळलेल्या सोसायटय़ांवर दावे दाखल
पालिकेकडून वारंवार माहिती देण्यात येऊनही दुर्लक्ष तसेच हेळसांडीमुळे डेंग्यूच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणारे घटक सोसायटीत तसेच घरात आढळल्याने ऑगस्ट महिन्यात ९२ जणांविरोधात न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहे. यात वैयक्तिक तसेच सोसायटय़ांचाही अंतर्भाव आहे. के पूर्व म्हणजे अंधेरी विभागात सर्वाधिक म्हणजे १४ जणांविरोधात, बी विभागात (जेजे परिसर) ११, आर दक्षिणमध्ये (कांदिवली) १०, एलमध्ये (कुर्ला) सात, इ (भायखळा) आणि एन (घाटकोपर) विभागात प्रत्येकी पाच जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत सुमारे ९० जणांना पालिकेने कारवाईसंबंधीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. आरोग्य अधिनियम ३८१ ब अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असून, डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून दोषी आढळल्यास या सोसायटय़ांना दंड होऊ शकतो