कोटय़वधी रुपये किमतीच्या भूखंडाची बनावट कागदपत्राआधारे विक्री केल्या प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकासह सहा व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध भूखंड विक्रीत शासकीय अधिकारीच सहभागी असल्याचे एक नवे प्रकरण पुढे आले आहे.
बनावट लेआऊटसोबतच आता इतरांचे भूखंड दडपण्याचा हा प्रकार भूखंड विक्री व्यवसायातील नवा बेकायदेशीर प्रकार ठरला आहे. वध्र्यालगत बोरगाव (मेघे) येथे सुरेशचंद्र बंसीलाल कोचर यांचे मोक्याचे दोन भूखंड आहेत. कोचरवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील भूखंडास सोन्याचा भाव आहे.
आरोपी माधव मनोहर वानखेडे व रंजना माधव वानखेडे (वर्धा), गिरीश मदनलाल राजवाला व राकेश रघुनाथ वर्मा (रा.मालगुजारीपुरा, यवतमाळ) यांनी मिळून कोचर यांचे कोचरवाडी परिसरातील दोन भूखंड हडपले. बनावट नकाशे तयार करून त्याची विक्री केली. या कामात त्यांना भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक झलके व भूनिरीक्षक डी.के.गरबे यांनी साथ दिली.
भूखंड मालक कोचर यांनी आज दुपारी याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सहाही आरोपींविरुध्द विविध गुन्हे दाखल करण्यात आले. अद्याप एकालाही अटक झालेली नाही. पत्नीसह मिळून हा गुन्हा करणारा बांधकाम ठेकेदार माधव वानखेडे हा शहरातील बडे प्रस्थ समजला जात असल्याने या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.