आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत कवितांचा कसा वाटा राहिला हे येथील कविवर्य किशोर पाठक यांनी उलगडून दाखविले. त्यासाठी निमित्त ठरले सिंचनभवन परिसरातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ‘कवितेवर बोलू काही’ या कार्यक्रमाचे.
संत ज्ञानेश्वर आणि कुसुमाग्रज हे नेहमीच माझे आदर्श राहिले आहेत. संत तुकारामांचाही आपणांस आशीर्वाद असल्याचे आपण मानतो. संत ज्ञानेश्वरांपेक्षा कवी ज्ञानेश्वर कायमच आपल्या हृदयात वास करीत असतात. यांसह वडिलांची शिस्त आणि संस्कार यामुळे आपण घडू शकलो, असे पाठक यांनी नमूद केले. ग्रामीण कथालेखक कवी विजयकुमार मिठे यांनी प्रास्तविक केले. प्रख्यात चित्रकार श्रीधर आंबोले यांच्या हस्ते कवी पाठक यांचा सत्कार करण्यात आला. गजलकार गौरवकुमार आठवले यांनाही गौरविण्यात आले. शासकीय वाचनालयाचे सहसचिव व ‘व्यासपीठ’ दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक कवी विवेक उगलमुगले यांनी चिंतनशील तसेच नर्मविनोदी शैलीने प्रश्न विचारत पाठक यांना बोलते केले.
मी असेन कुणीही, माणूस माझे गोत्र
आयुष्यात हे विस्तीर्ण नदीचे पात्र।
धर्मानी नहावे स्वच्छ मनाचे पाणी
हा थेंब गातसे मानवतेचे स्तोत्र।
जातपात, गोत्र, धर्म या माणसामाणसांतील अदृश्य िभंतींना ओलांडून सर्वानीच विशाल मनाने मानवतेचे स्तोत्र गावे अशी कामना करणारे कवी पाठक यांच्या आशयघन कविता तसेच बालकवितांनी या कार्यक्रमात रसिकांना जिंकून घेतले.
युवा कवी प्रशांत केंदळे यांनी आभार मानले. व्यासपीठावर प्रतिभा पाठक याही उपस्थित होत्या.