राज्याच्या गृहदफ्तरी अतिसंवेदनशील अशी ओळख असणाऱ्या नांदेड जिल्हय़ातील बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सामान्य माणसांच्या संपर्काची अ‍ॅलर्जी झाली आहे काय? असा सवाल केला जात आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वगळता एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
पोलीस व जनता यांच्यातील दरी दूर व्हावी, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत आहेत. सामान्य नागरिकांच्या मदतीशिवाय पोलिसांचे काम पूर्ण होऊ शकत नाही, असे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी वेगवेगळय़ा व्यासपीठावरून सांगत असले, तरी नांदेडात मात्र गेल्या काही दिवसांपासून याउलट स्थिती आहे.
एखादी घटना घडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचा अधिकारी पोहोचण्यापूर्वीच काही अधिकारी घटनास्थळी हजर राहात होते.
आता मात्र अधिकाऱ्यांना एका अप्रिय घटनेची माहिती सांगूनही पोलीस वेळेच्या आत येतीलच, याची खात्री नाही. शहर तसेच जिल्हय़ात वेगवेगळय़ा गंभीर गुन्हय़ांची मालिका सुरू आहे. अनेक गुन्हय़ांची फिर्यादही पोलीस घेत नाहीत.
एकीकडे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून न्याय नाही, तर दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारीही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, असे चित्र आहे.
पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विठ्ठलराव जाधव यांनी स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्धीस देऊन संपर्क साधण्याचे आवाहन केले, पण प्रत्यक्षात ते दूरध्वनीवर उपलब्ध होत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. वास्तविक, एखादी गोपनीय माहिती स्वत:चे नाव न सांगता ‘खबरी’ देण्याच्या मानसिकतेत असतो. अशा माहितीवरून अनेक गंभीर गुन्हय़ांची उकल झाल्याच्या घटना आहेत. परंतु अधिकारीच सामान्यांच्या संपर्कात येणार नसतील तर पोलीस व जनता यांच्यातील दरी कशी दूर होईल, असा सवाल एका पोलीसमित्राने केला.
मोठा गाजावाजा करून पोलीसमित्र संकल्पनेचे पुस्तक काढण्यात आले. त्याच्या खर्चासाठी जिल्हय़ात बहुतांश ठाण्यांतील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ‘टाईट’ करण्यात आले. पण ज्यांना पोलीसमित्र करण्यात आले होते अशांना पोलीस ठाण्यातील अधिकारीही दाद देत नाही, अशी स्थिती आहे.