धुळे येथील दंगलीच्या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद शहरात पोलिसांचा मोठाताफा चौका-चौकांत तपासणीसाठी उभा राहिला आणि प्रत्येक जण एकमेकांना विचारू लागला, ‘नक्की काय झाले हो!’ उत्तर कोणीच देत नव्हते. ‘सावधान, तपासणी चालू आहे’, असेच वातावरण दिवसभर होते.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्ये पोलिसांनी गाडय़ा अडविण्यास सुरुवात केली. ज्या गाडय़ांवर क्रमांक नाही, त्या चालकाला रस्त्याच्या कडेला बाजूला घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस दंड आकारत होते. वाहन चालविण्याचा परवाना, गाडीची कागदपत्रेही तपासली जात होती. प्रत्येक चौकात पोलिसांची वाढलेली संख्या लक्ष वेधून घेणारी असल्याने काही अघटित घडले आहे काय, याच्या चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयातही विचारणा केली जात होती. धुळे दंगलीच्या पाश्र्वभूमीवर आणि वाहतूक पंधरवाडय़ाच्या निमित्ताने ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.