पदरचे खर्चून निवडणुकीचे काम करणारे कार्यकर्ते ही जवळपास इतिहासजमा झालेली बाब असल्याने, मतदानाच्या दिवशी काम करणा-या कार्यकर्त्यांची ‘सोय’ लावणे हा राजकीय पक्षांसाठी स्वतंत्र व्यवस्थापनाचा विषय झालेला आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून कार्यकर्ते बूथवर जमू लागले होते. जितका तगडा उमेदवार तितकी कार्यकर्त्यांची संख्या अधिक असे सर्वसाधारण चित्र असले तरी भाजपच्या सगळयाच बूथवर तरुण, महिला व पुरुष कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. जसाजसा घडयाळाचा काटा १० वाजेकडे सरकू  लागला तशीतशी कार्यकर्त्यांची नाश्त्याकरिता मागणी सुरु झाली. कार्यकर्ते खूष तर काम व्यवस्थित होणार असल्याने उमेदवारांनीही पोहे, बटाटेवडे, समोसा, उपमा, साबुदाणा खिचडी अशी त्यांच्या उदरभरणाची जय्यत तयारी केली होती. भाजपसकट इतर पक्षाच्या बहुतांश उमेदवारांनी  ‘निवडणूक विशेष’ पुरी-भाजीचीच व्यवस्था केली होती तर उत्तर नागपुरातील मोमीनपु-यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची सोय करण्यात आली होती. सर्वच राजकीय पक्षांनी खाण्यापिण्याचे पदार्थ एका ठिकाणी बनविणे आणि तयार डबे बूथवर पोचविणे अशीच पद्धत वापरली.
इतरवेळी असो नसो पण सगळयाच ठिकाणी न्याहारी आणि जेवणाच्या वेळेस कार्यकर्त्यांची संख्या वाढली होती. अर्थात, यालाही अपवाद होता आणि आम्ही घरी जाऊन जेवू आणि परत बूथवर येऊन काम करू असे  खामल्यातील सिंधी कॉलनीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. केवळ खाण्याने भागणार नव्हते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पिण्याचीही म्हणजे चहा- कॉफीची सोयही करावी लागत होती. मध्येच आलेल्या पावसाने बूथवरील चहाच्या मागणीत मात्र वाढ झाली होती. याशिवाय, मिनरल वॉटरच्या बाटल्या आणि पाण्याचे पाऊच तत्परतेने कार्यकर्त्यांपर्यंत पोचविले जात होते.