मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे आता त्यांचा गाजलेला ‘झपाटलेला’ पुन्हा एकदा घेऊन येत आहेत. तोदेखील थ्रीडी स्वरूपात! लक्ष्या आणि महेशने मिळून उभारलेल्या या ‘श्रीरंगपूर’मध्ये पुन्हा एकदा जाताना कसं वाटलं, ‘झपाटलेला-२’चा हा प्रवास कसा होता, काय काय गंमत झाली, या सगळ्या गोष्टी त्यांच्याच शब्दांत..
श्रीरंगपूर नावाच्या आटपाट नगरात मी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांने मिळून प्रवेश केला होता. या आटपाट नगरात लक्ष्याला ‘तात्या विंचू’ने झपाटलं. मग मी त्याला वाचवलं. बाप रे, १५-२० वर्षे उलटून गेली या सगळ्याला. पण आता आठवलं की वाटतं, अरे, ही तर कालचीच गोष्ट! ‘झपाटलेला-२’च्या निमित्ताने ते झपाटलेले दिवस पुन्हा एकदा अनुभवता आले. मात्र या सगळ्या प्रवासात आम्ही नव्याने वसवलेल्या श्रीरंगपूरमध्ये लक्ष्याची कमी जाणवली. ‘धुमधडाका’पासून तो जवळपास माझ्या प्रत्येक चित्रपटात होताच होता. अगदी त्याच्या शेवटच्या ‘पछाडलेला’ या चित्रपटापर्यंत!
‘झपाटलेला’ मध्ये माझ्याबरोबर लक्ष्या होता, आता याच चित्रपटाचा पुढचा भाग तयार करताना तो नाही. या झपाटलेला-२ मध्ये ‘लक्ष्या’चा मुलगा म्हणून आदिनाथ काम करत आहे. ‘झपाटलेला’ म्हणजे तात्या विंचू हे समीकरण एवढं घट्टं आहे की, ‘झपाटलेला-२’ बनवताना आता २१व्या शतकात तात्या विंचू कसा सादर करायचा, हा प्रश्न होता. मग डोक्यात ‘थ्रीडी’चा विचार आला. थ्रीडीचं तंत्रज्ञान मराठीत आणणं तेवढं सोपं नव्हतं. भारतातच थ्रीडी तंत्रज्ञान फारसं प्रसिद्ध नसल्यामुळे तंत्रज्ञच नाहीत. हे सगळे तंत्रज्ञ मग परदेशातून आणावे लागतात. त्यांचं मानधन डॉलर्समध्ये द्यावं लागतं. पण हा सगळा विचार बाजूला ठेवून मी पटकथा लिहिली.
याच वेळी सिलेक्ट मीडिया नावाची कंपनी आमच्या मदतीला आली. त्यांना आमचं स्क्रीप्ट आवडलं आणि त्यांनी यातील काही भार उचलण्याचं मान्य केलं. विशेष म्हणजे चित्रपट तयार केल्यानंतर तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येणारा खर्च वायकॉम-१८ ने उचलला. माझा मित्र जयेश मुजुमदार तिथे असल्याने आणि त्यालाही स्क्रीप्ट आवडल्याने ही गोष्ट सोपी झाली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात चित्रपटाला प्रतिसाद चांगला मिळाला, तर सबटायटल्ससह हा चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्याचाही माझा विचार आहे.
थ्रीडी चित्रपट बनवताना आलेला अनुभव खूपच विलक्षण होता. मुख्य म्हणजे, मी हा प्रकार पहिल्यांदाच हाताळत होतो. सुदैवाने माझ्याबरोबर माझे छायासंकलक सुदेश देशमाने होते. दरम्यान, हैदराबादमध्ये एका तेलुगू थ्रीडी चित्रपटाचं चित्रिकरण सुरू होतं. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी संपर्क करून मी त्याच्याकडे तिथे येण्याची परवानगी मागितली. त्यानेही परवानगी दिली. तिथे पायलट नावाचा एक अमेरिकन तंत्रज्ञ मला भेटला. त्याने माझी ओळख थ्रीडी तंत्रज्ञानाशी करून दिली.
‘झपाटलेला-२’साठी  स्पेनवरून एरिक नावाचा तंत्रज्ञ आला होता. त्याच्याबरोबर काम करताना सुरुवातीला दडपण होतं. कारण तिथले कलाकार खूपच शिस्तीत काम करतात. त्यांच्याकडे आठ तासांची शिफ्ट संपली की काम थांबवतात. त्याचप्रमाणे शनिवार-रविवार काम चालत नाही. मला हे सगळं परवडण्यासारखं नव्हतं. मग मी त्याच्याशी मैत्री केली आणि त्यानेही पूर्ण सहकार्य केलं.
चित्रपटात आदिनाथ आणि बायको म्हणजे उर्मिला दोघेही दिसणार आहेत. उर्मिलाने नृत्याचं अधिकृत शिक्षण घेतलं आहे आणि त्याचबरोबर ती खूप चांगली अभिनेत्रीही आहे. तिच्या नृत्यकौशल्याचा उपयोग मला माझ्या एखाद्या चित्रपटात करायचा आहे. ‘झनक झनक पायल बाजे’सारखा एखादा नृत्यावर आधारित चित्रपट तिला घेऊन करायची इच्छा आहे. ‘झपाटलेला’ या चित्रपटावर त्या वेळी रसिकांनी भरभरून प्रेम केलं. आम्हा सगळ्यांना पुन्हा तेच प्रेम रसिकांकडून मिळेल, अशी अपेक्षा नाही, तर खात्रीच आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट