डोंबिवलीतील विष्णुनगर, रामनगर, मानपाडा, एमआयडीसी, फडके रस्त्यावरील टपाल कार्यालयांची कोणतीही डागडुजी गेल्या अनेक वर्षांत टपाल कार्यालयांकडून करण्यात आलेली नाही. ही टपाल कार्यालये सध्या पावसाच्या पाण्याने गळत आहेत. पावसाचे ठिबकणारे पाणी, कोंदट वातावरण, बसायला पुरेशी जागा नाही. त्यामुळे या तिन्ही टपाल कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्राहकही जीव मुठीत घेऊन या कार्यालयांमध्ये प्रवेश करीत आहेत.
विष्णुनगर टपाल कार्यालयाची पंडित दीनदयाळ रस्त्यावर असलेली एक माळ्याची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीचा पहिला माळा पावसाच्या पाण्याने पूर्णत: गळतो. इमारतीच्या चारही बाजूने भिंतींना तडे गेले आहेत. खिडक्यांना तावदाने, झडपा नसल्याने पावसाचे पाणी थेट कार्यालयात येते. हजारो नागरिक दररोज विष्णुनगर टपाल कार्यालयात आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी येतात. चाळीस ते पन्नास कर्मचारी या टपाल कार्यालयात कार्यरत आहेत.
 बाहेरून आलेले टपाल विभागाप्रमाणे लावण्यासाठी पहिल्या माळ्यावर जागा होती. तेथे पाण्याची गळती सुरू असल्याने पोस्टमनची बसण्याची अडचण झाली आहे. जीव हातावर घेऊन, आरोग्याची पर्वा न करता आम्हाला आमची नोकरी करावी लागते. वरिष्ठांकडून या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
डोंबिवली पूर्वेतील दत्तनगरमधील रामनगर टपाल कार्यालय १० बाय २० च्या एका चौकोनी गाळ्यात आहे. या ठिकाणी चार कर्मचारी कार्यरत आहेत. या टपाल कार्यालयात वरच्या माळ्यावरील रहिवाशांच्या शौचालय, स्नानगृहातील पाणी सतत ठिबकत असते. या सांडपाण्यापासून बचाव करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी छताला ताडपात्री लावली आहे. ताडपत्रीत साचलेले सांडपाणी नंतर जमिनीवर ठिबकते. टपाल कार्यालयातील फाइल्स ठेवायला, बसायला जागा नाही. आरडी व इतर एजंटची गर्दी, अशा वातावरणात येथील चार कर्मचारी कार्यरत आहेत. या टपाल कार्यालयात पाणी पिण्याची, प्रसाधनगृहाची कोणतीही सुविधा नाही. रस्त्यावरील सार्वजनिक प्रसाधनगृहात कर्मचाऱ्यांना जावे लागते. महिला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक कुचंबणा होते. या कोंदट वातावरणामुळे या टपाल कार्यालयातील कर्मचारी सतत आजारी असतात. त्याचा त्रास ग्राहकांना होतो.
फडके रस्त्यावरील टपाल कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. खिडक्यांची तुटलेली तावदाने, आडोसा म्हणून लावलेल्या ताडपत्र्या असे चित्र या टपाल कार्यालयात दिसते. उभे राहायला व्यवस्थित जागा नाही. वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर या तिन्ही टपाल कार्यालयांमध्ये मेणबत्ती लावून काम करावे लागते. ठाणे येथील टपाल अधीक्षक, पोस्ट मास्तर जनरल यांनी या टपाल कार्यालयांमध्ये काही दुर्घटना घडण्यापूर्वीच सुधारणा करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मानपाडा, एमआयडीसी कार्यालयेही अशीच सडली आहेत.‘लोकसत्ता’ने गेल्या तीन वर्षांपूर्वी टपाल कार्यालयाच्या दुरवस्थेविषयी सोळा भागांची मालिका प्रसिद्ध केली होती. खासदार आनंद परांजपे यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. नंतर ते हवेत विरले. त्या वेळी टपाल कार्यालयांचे टप्प्याने नूतनीकरण येत असल्याचे उत्तर ठाण्याच्या टपाल अधीक्षकांनी दिले होते.
दरम्यान, ही टपाल कार्यालये अनेक वर्षांपासून एका इमारत गाळ्यात आहेत. त्यांची भाडी खूप कमी आहेत. मालकाला हे भाडे परवडत नसल्याने तो या ठिकाणी सुविधा देण्यास टाळाटाळ करतो, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.