यंत्रमाग कामगारांना दरमहा १० हजार रुपये मिळावे, या मुख्य मागणीसाठी इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांनी सोमवारी संप करून प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. संयुक्त कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १६ जानेवारी रोजी मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास २१ जानेवारीपासून कामगार बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा देण्यात आला.
यंत्रमाग कामगारांची गेले अनेक वर्षे पुनर्रचना केलेली नाही. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतनासह कसल्याही कल्याणकारी सुविधा उपलब्ध होत नाहीत. महागाईमुळे मिळणाऱ्या पगारात संसाराचा गाडा चालविणे अशक्य बनले आहे. नवीन कामगार या क्षेत्रात येत नसल्याने व्यवसायाचे भवितव्य कठीण आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंत्रमाग कामगारांना आठ तासांच्या पाळीसाठी दररोज ४०० रुपये किंवा दरमहा १० हजार रुपये पगार मिळावा, कामगारांना विमा योजना लागू व्हावी, हजेरी कार्ड मिळावे, घरकुल योजना राबवावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
राजर्षी शाहू पुतळय़ापासून मोर्चाला सुरुवात झाली. तीन बत्ती, संभाजी चौक, चांदणी चौक, राजवाडा चौक, मलाबादे चौक मार्गे मोर्चा सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. कॉ. दत्ता माने, मिश्रीलाल जाजू, श्यामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, हणमंत लोहार, परशुराम आगम, सचिन खोंद्रे आदींची भाषणे झाली. मोर्चातील शिष्टमंडळाने सहायक कामगार आयुक्त बी. डी. गुजर यांना निवेदन दिले. गुजर यांनी १६ जानेवारीला कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत मंत्रालयात कामगार प्रतिनिधींची बैठक होणार असून त्यामध्ये निर्णय होणार असल्याचे सांगितले.
मोर्चात शहर व परिसरातील यंत्रमाग कामगार मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दिर्घकालावधीनंतर कामगारांचा भव्य मोर्चा निघाल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कामगार संपावर गेल्याने बहुतांशी यंत्रमाग बंद होते.