यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नावरून यंत्रमागधारक व कामगार या दोन्ही घटकांनी मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शनाची तयारी चालवली आहे. या प्रश्नात मार्ग काढावा, या मागणीसाठी यंत्रमाग कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने उद्या सोमवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला जाणार आहे. तर आठ तासांच्या पाळीला विरोध दर्शवण्यासाठी यंत्रमागधारकांच्या वतीने मंगळवारी इचलकरंजीतील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दोन्ही घटकांकडून मोर्चाच्या तयारीसाठी भागाभागात बैठकांचे सत्र सुरू आहे. कामगारांच्या कामबंद आंदोलनाच्या ३६व्या दिवशी हा प्रश्न मिटण्याऐवजी आणखी तापत चालल्याचे चित्र दिसत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रमाग कामगारांना दरमहा १० हजार रुपये वेतन मिळावे, या मागणीसाठी कामगार कृती समितीच्या वतीने २१ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री, कामगारमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे डझनावारी बैठका पार पडल्या. पण तोडगा निघू शकला नाही. आता कामगारांनी आठ माग, आठ तास पाळी व मीटर मागे ८५ पैसे मजुरी असा प्रस्ताव सादर केला आहे. तथापि यंत्रमागधारकांनी आठ तासांच्या पाळीला आक्षेप घेत प्रचलित पद्धतीने म्हणजे १२ तास पाळी असावी, अशी मागणी उचलून धरली आहे. त्यामुळे मजुरीवाढीऐवजी आठ तास पाळी हाच वादाचा केंद्रबिंदू बनला असून त्यावर प्रथम मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
या विषयावरूनच यंत्रमागधारक व कामगारांतील वाद चिघळत चालला आहे. कामगार कृती समितीची सभा थोरात चौकात होऊन त्यामध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चामध्ये शहर व परिसरातील कामगार मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावा, यासाठी कामगार नेत्यांनी कंबर कसली आहे. दत्ता माने, मिश्रीलाल जाजू, श्यामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, राजेंद्र निकम, हणमंत लोहार, सचिन खोंद्रे, मदन मुरगुडे आदी कामगार नेत्यांनी भागाभागात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे हे प्रयत्न पाहता मोर्चाला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे यंत्रमागधारकांनी आठ तासांच्या पाळीला विरोध करण्यासाठी जय्यत तयारी चालवली आहे.प्रांत कार्यालयावर मंगळवारी निघाणाऱ्या मोर्चात यंत्रमागधारकांचा व्यापक सहभाग असावा, यासाठी विभागीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. इचलकरंजी पॉवर लूम असोसिएशन, राष्ट्रवादी पॉवर लूम असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा यंत्रमागधारक संघटना, जागृती यंत्रमागधारक संघटना व पॉपलिन कापड उत्पादक संघटना अशा सर्व संघटनांनी एकत्रितरीत्या यंत्रमागधारकांचे संघटन सुरू केले आहे. सतीश कोष्टी, विश्वनाथ मेटे, दीपक राशिनकर, विनय महाजन व सचिन हुक्किरे हे पाचही संघटनांचे अध्यक्ष व त्यांचे संचालक भागाभागात फिरून यंत्रमागधारकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.
    दरम्यान, कामगारमंत्री मुश्रीफ यांनी या प्रश्नात मार्ग काढण्यासाठी एक समिती नेमली आहे. समितीचे सदस्य आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी स्वतंत्ररीत्या यंत्रमागधारक व कामगार प्रतिनिधींशी चर्चा करत या प्रश्नात तोडगा निघावा यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येते याकडे वस्त्रनगरीचे लक्ष वेधले आहे.