दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या नाटय़संकुलाचा लोकार्पण सोहळा येत्या २९ डिसेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संपन्न होत असल्याची माहिती डॉ. फडकुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास फुटाणे व सचिव विष्णुपंत कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या नाटय़गृहाची उभारणी कायदेशीर असल्याचा दावा करताना यासंदर्भात आम आदमी पार्टीने घेतलेला आक्षेप तद्दन खोटा असल्याचा निर्वाळा फुटाणे व कोठे यांनी दिला.
दरम्यान, डॉ. फडकुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नाटय़संकुलाचे बांधकाम व त्यातील एकूणच व्यवहार कायदा वाकवून व प्रशासनाला अक्षरश: झुकवून करण्यात आले आहे. या वादग्रस्त नाटय़संकुलाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रपतींसारख्या सर्वोच्चपदावरील व्यक्तीने करणे नैतिकदृष्टय़ा चुकीचे असल्याच्या मुद्यावर आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सोलापूरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला खेटून सिद्धेश्वर मंदिराजवळील पूर्वीच्या भगिनी समाजच्या जागेवर हे नाटय़गृह उभारण्यात आले आहे. सदर जागा राज्य शासनाच्या मालकीची असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून खरेदी करण्यात आली आहे. मात्र त्याची पावती राज्य शासनाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे यात वाद असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच पुरातत्त्व वस्तुसंरक्षण कायद्यानुसार रीतसर परवानगी मिळाली असून यात कोणतीही बाब आक्षेपार्ह नसल्याचा दावा कोठे यांनी केला. डॉ. फडकुले प्रतिष्ठान हे सामाजिक उपक्रमासाठी स्थापन करण्यात आले असून, या नाटय़संकुलात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. परंतु काही व्यक्ती प्रतिष्ठानला बदनाम करून डॉ. फडकुले यांच्या नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही कोठे यांनी केला.
डॉ. फडकुले प्रतिष्ठानच्या नाटय़संकुलाचा लोकार्पण सोहळा २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी प्रा. विलास बेत, दत्ता गायकवाड, बाबूराव मैंदर्गीकर, वासुदेव इप्पलपल्ली आदी उपस्थित होते.
धरणे आंदोलन
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या नाटय़संकुलाला आपला अजिबात विरोध नाही, तर या नाटय़गृहाची उभारणी कायदा वाकवून व प्रशासन यंत्रणेला झुकवून करण्यात आली आहे. यात पुरातत्त्व विभागाचा कायदा सरळ सरळ वाकविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मालकीच्या जागेची महापाालिका परस्पर कशी विक्री करते, या जागेवर उभारण्यात आलेले नाटय़संकुल शहर विकास आराखडय़ानुसार अनुज्ञेय नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु तरीदेखील या नाटय़संकुलाच्या लोकापर्ण सोहळय़ासाठी राष्ट्रपती येतात ही बाब धक्कादायक असून चुकीचा संदेश देणारी आहे, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात लढा देणारे आम आदमी पार्टीचे नेते विद्याधर दोशी यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्याधर दोशी यांच्यासह चंदूभाई देढिया, विलास शहा, रुद्रप्पा बिराजदार, मकरंद चनमल, एम. जी. बागवान, शिवाजी राठोड, नागनाथ काटकर, गोपालकृष्ण कुलकर्णी, बाबा शेख, फारूख शेख, हुसेन नदाफ, इलाही पटेल आदींनी सहभाग नोंदविला होता. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांना निवेदन सादर करून राष्ट्रपतींनी सोलापुरात येऊ नये म्हणून आवाहन करण्यात आले.