राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पृथ्वी, अजित, बाबा अशी नावे वापरून राजरोसपणे बंदी असलेली एक अंकी म्हणजेच झटपट लॉटरी शहराच्या काही भागात पुन्हा सुरू झाली आहे. लॉटरीविषयक कायद्यानुसार झटपट लॉटरीला बंदी असतानाही पोलिसांच्या आशीर्वादाने विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली आहेत. कामगार वस्ती असलेल्या एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रेत्यांची संख्या लक्षणीय आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरी वा अन्य राज्यांच्या लॉटरी विकण्यासाठी या विक्रेत्यांना परवाने दिले जातात. या लॉटऱ्या नावापुरत्या ठेवून प्रामुख्याने झटपट लॉटरी विक्रीकडेच या विक्रेत्यांचा कल असतो. दर १५ मिनिटाला एक सोडत जाहीर केली जाते. कामगार वस्तीत विक्रेत्यांची संख्या अधिक असून रोजंदारी कामगार हे ग्राहक असतात.
पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत झटपट लॉटरी विकली जाते. पाच रुपयांच्या बदल्यात २०, ५० रुपये मिळतात. बम्पर बक्षिसाच्या आमिषापोटी अगदी खिसा रिकामा होईपर्यंत सोडत काढली जाते. हा धंदा इतका तेजीत होता की, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील ऊर्फ आबा वगळता अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आद्याक्षराने या लॉटऱ्या विकल्या जात होत्या. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून ही दुकाने बंद पाडली होती. या प्रकरणी गृहमंत्रालयानेच दखल घेतल्याने पोलिसांना झटपट लॉटरीच्या विक्रीवर बंदी आणावी लागली. जेमतेम आठवडाभर ही कारवाई सुरू होती. त्यानंतर आता पुन्हा हे विक्रेते पुढे सरसावले आहेत.
लोअर परळ, चिंचपोकळी, एन. एम. जोशी मार्ग, करी रोड, काळा चौकी, कॉटन ग्रीन, शिवडी, लालबाग, एल्फिन्स्टन रोड, दादर, अंधेरी, गोरेगाव, मालाड आदी रेल्वे स्थानकाबाहेर झटपट लॉटरी विक्रेत्याचे अनेक स्टॉल दिसून येतात. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने जोरदार विक्री सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.