राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा उपनिबंधक परीक्षेत डॉ. प्रिया शिवाजीराव दळणर या राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जिल्हा उपनिबंधक, सहायक विक्रीकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्हा उपनिबंधकांच्या यादीत राज्यात डॉ. प्रिया दळणर यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे. डॉ. प्रिया यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जालना जिल्ह्यातील अंबड येथे झाले. डॉ. प्रियाने अकरावी व बारावीचे शिक्षण संत तुकाराम महाविद्यालयात पूर्ण केले. नांदेड येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात एम.डी. बालरोग तज्ज्ञचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तीन महिन्यांपूर्वी विक्रीकर अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या डॉ. प्रियाला ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा आहे. या यशामागे वडील डॉ. शिवाजी दळणर व आई मधुबाला यांची प्रेरणा असल्याचे डॉ. प्रिया यांनी सांगितले.