नाशिक-इगतपुरी महामार्गाची स्थिती

महामार्ग विस्तारीकरणामुळे नाशिक-मुंबई दरम्यानच्या वेगवान प्रवासाला खड्डय़ांचे ग्रहण लागले असून मुख्य रस्त्याबरोबर दोन्ही बाजुंच्या साईड पट्टय़ावरही जागोजागी खाचखळगे आणि खड्डे पडल्याने हा प्रवास लक्षणिय मंदावला आहे. या मार्गावर पथकर वसुली केली जात असताना रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल वाहनधारकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
विकासाचा राजमार्ग म्हणून गवगवा केल्या जाणाऱ्या आणि काही वर्षांपूर्वी बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर बांधला जाणारा हा महामार्ग पावसाळ्यात खड्डय़ांच्या भोवऱ्यात सापडला आहे. वास्तविक, या महामार्गाच्या कामात वेळोवेळी गुणवत्तेच्या चाचण्या घेऊनही संततधारेने रस्त्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. इगतपुरी व नाशिक दरम्यान महामार्गावर जागोजागी खड्डे असून त्याची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून मुंबई-आग्रा महामार्गाचे चार व सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील पडघा ते गोंदे दुमालापर्यंतचे चौपदरीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्या टप्प्यातील प्रवासाबद्दल वाहनधारकांकडून नियमानुसार पथकर वसुलीही केली जाते. दुसऱ्या टप्प्यातील गोंदे ते पिंपळगाव बसवंतपर्यंतच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असले तरी या मार्गावरील सव्‍‌र्हीस रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. महामार्गावरील साईड पट्टय़ांची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. इगतपुरी ते नाशिक या ४५ किलोमीटर अंतरातील साईड पट्टय़ांची वाताहत झाली असून गोंदे फाटय़ावर भले मोठ्ठे खड्डे पडल्याचे दृष्टिपथास पडते. तसेच वाडिवऱ्हे शिवारात रेमंड, थायसन ग्रुप, व्हिटीसी कारखान्यांसमोरील परिसरात जागोजागी खड्डे पडलेले आहेत.
घोटी ते पडघा दरम्यानच्या महामार्गावरून मार्गस्थ होण्यासाठी ९५ ते ५६० रूपयांपर्यत पथकर वसुली केली जाते. वसुलीचे हे काम जोरात सुरू असले तरी रस्त्याच्या अवस्थेकडे संबंधित कंपनीकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. इगतपुरी व परिसरात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. यंदा प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. खड्डय़ांमुळे महामार्गावरील वाहतूक धोकादायक झाली असताना महामार्गाच्या बाजुला उभे राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे नवी समस्या निर्माण झाली आहे. अवजड वाहने अनधिकृतपणे कुठेही उभी राहतात. त्याचा फटका इतर वाहनधारकांना सहन करावा लागतो. या सर्व घडामोडींचा परिणाम नाशिक-मुंबई प्रवासाचा वेग मंदावण्यात झाल्याची वाहनधारकांची प्रतिक्रिया आहे.

खड्डय़ांमुळे वेगवान प्रवास मंद झाला