अनु. जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खासगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्यासाठीच्या आराखडय़ातील त्रुटी दूर करा, पाणीपुरवठा व स्वच्छताअंतर्गत कामाच्या निधीसाठी परिपूर्ण नियोजनासह आराखडे तयार करून २ जानेवारीला मंत्रालयात या, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिल्या.
हिंगोली येथे दुपारी २ वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ढोबळे रात्री ८ वाजता पोहोचले. यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल, ग्रामीण पाणीपुरवठय़ाचे वरिष्ठ अधिकारी, प्रभारी कार्यकारी अभियंता यबंडवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जि. प. सदस्य उपस्थित होते.

नगराध्यक्ष दिलीप चव्हाण व जि. प. सदस्य मुनीर पटेल यांनी पाणीपुरवठय़ाच्या वीजबिलावर चर्चा करताना दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन वीजदेयकात काही सवलत देण्याची मागणी केली. चव्हाण यांनी नगरपालिकेची मागणी, बिल व योजनेवरील खर्च, वीजदेयक यामधील तफावत मोठी असल्याने वीजदेयक या वर्षी माफ करण्याची मागणी केली.
या वेळी ढोबळे यांनी जलस्वराज्य पाणीपुरवठा, जीवन प्राधिकरण योजनेच्या कामाचा आढावा घेतला. जलस्वराज्य अंतर्गत पाणीपुरवठय़ाची कामे पूर्ण व्हावीत याकरिता चार वेळा मुदतवाढ दिली. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने आता तो विषय संपविल्याचे ते म्हणाले. जलस्वराज्य अंतर्गत अपहार व अपूर्ण काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे हा अंतिम उपाय नाही. तर, ज्या योजना अपूर्ण आहेत, त्या गावातील पाणीपुरवठय़ाचे अध्यक्ष, सचिव, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन त्यांना समजावून सांगा व अपूर्ण काम पूर्ण करून घ्या, असे सांगितले. गरज वाटल्यास त्या अपूर्ण कामाच्या फेरनिविदा काढा. चांगले काम करणाऱ्या ग्रामसेवकांची त्या गावी बदली करून त्याच्याकडून काम पूर्ण करून घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
वैयक्तिक शौचालयासाठी १३५४६ प्रस्ताव असून अन्य सर्व उपाययोजनांकरिता सुमारे २१ कोटी २१ लाख १० हजारांच्या निधीची आवश्यकता असल्याचे अभियंता यबंडवार यांनी सांगितले.