व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तविकतेपासून दूर जात असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार आणि ग्रामीण जनजीवनाचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी व्यक्त केले. प्रकल्पांसाठी जमिनीच्या अधिग्रहणामुळे खरा शेतकरी संपत चालला असल्याची व्यथाही त्यांनी मांडली. पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी लिहिलेल्या ‘अ विलेज अवेट्स डूम्सडे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पी. साईनाथ बोलत होते. पत्रकार भवन सभागृहात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर होते.
माध्यमांचे व्यावसायीकरण झाले असून परिणामी माध्यमे वास्तविकतेपासून दूर जात आहेत. फॅशन शोचे वृत्तांकन करायला शेकडो पत्रकारांची गर्दी होते. मात्र, दुष्काळ व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वृत्तांकन त्या प्रमाणात अत्यल्प होते. कामगार व बेरोजगारांची संख्या देशात मोठी आहे. या समस्येचे वृत्तांकन करण्यासाठी माध्यमांमध्ये पूर्णवेळ वार्ताहर नसतो. आयपीएल सामन्यांचे किंबहुना क्रिकेट, जाहिरात व बॉलीवुड यांचे वृत्तांकन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. पेड न्यूजचे प्रमाणही वाढले आहे.
आर्थिकतेशी संबंधित क्षेत्रे असल्याने या क्षेत्रांना प्रसिद्धी मोठय़ा प्रमाणात देण्याचा कल वाढला आहे. माध्यमांचे व्यावसायीकरण झाल्याने असे होत आहे. राजकारणी तसेच आता व्यावसायिकांनीही माध्यम क्षेत्रावर ताबा मिळविला आहे. अशाही परिस्थितीत काही वृत्तपत्रे तसेच पत्रकार प्रामाणिकतेने कार्य करीत असल्याचेही पी. साईनाथ म्हणाले.
या पुस्तकाचे लेखक जयदीप हर्डीकर यांनी देशाच्या विविध भागात फिरून प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या समस्यांवर या पुस्तकातून प्रकाश टाकला असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. प्रकल्पांसाठी जमिनींचे मोठय़ा प्रमाणात अधिग्रहण केल्याने खरा शेतकरी संपत चालला असून शेतमजुरांची संख्या वाढत आहे.
एकटय़ा आंध्र प्रदेशात आतापर्यंत वीस लाख एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून त्यातील जमिनी या बहुतांश दलित व आदिवासींच्या होत्या. तेरा लाख शेतकरी संपले. शेतमजुरांची संख्या ३५ लाखांपर्यंत वाढली आहे. शेतमजुरी वा इतर कामे करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. देशात परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. देशात ७७ लाख शेतकरी संपल्याचे २०११च्या जनगणनेच्या आधारे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मेघनाद बोधनकर यांनी जयदीप हर्डीकर यांचे कौतुक केले. प्रारंभी गोसीखुर्दच्या प्रकल्पग्रस्त समीक्षा गणवीर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जयदीप हर्डीकर यांनी लेखनामागील भावना व्यक्त केल्या. टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे संचालन टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे सचिव शिरीष बोरकर यांनी तर नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर, अरुण फणशीकर, विनोद देशमुख, प्रकाश दुबे, चंद्रकांत वानखडे, मनोहर अंधारे, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले तसेच हरीश अडय़ाळकर, दिवाकर मोहनी, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, कामगार नेते मन्नू दत्ता, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर आणि अनेक पत्रकार याप्रसंगी उपस्थित होते.