शहरातील संभाजीनगर भागातील तब्बल २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्राध्यापकाचा मृतदेह औसा रिंगरोडवरील नालीत मंगळवारी दुपारी पोलिसांना सापडला. प्रियकराच्या मदतीने प्राध्यापकाच्या पत्नीने खून केला असावा असा पोलिसांचा कयास आहे. सुधाकर सातपुते असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे.
निलंगा तालुक्यातील बोरसुरू येथे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर सातपुते मागील ५ एप्रिलपासून बेपत्ता होते. त्यांचे बंधू बलभीम सातपुते यांनी १६ एप्रिल रोजी तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्राध्यापकांची पत्नी सगुणा सातपुते व तिच्या अन्य चार साथीदारांविरुद्ध खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.
माझ्या पतीचा शोध घ्या, अशी मागणी करणाऱ्या सगुणा सातपुतेवर गुन्हा दाखल होताच ती साथीदारासह फरार झाली. पोलीस उपनिरीक्षक धुमाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी संशयित आरोपी आकाश बालाजी तेलंगे व एका ऑटोचालकास अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हय़ाची कबुली दिली. सगुणा सातपुते व तिचा प्रियकर गोविंद शिंदे, मेहुणा संतोष सरवदे, छायाचित्रकार अजय बचाटे आदींनी प्राध्यापक सातपुते यांचा खून केल्याची कबुली दिली. प्रा. सातपुते यांचे प्रेत औसा रिंगरोडवरील पोतदार इंग्लिश स्कूलसमोरील गटारात टाकल्याचे सांगितले. या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी ते आकाशच्या ऑटोतून रिंगरोडकडे नेण्यात आले होते. यासंदर्भात पोलिसांनी सगुणा सातपुते, प्रियकर गोविंद शिंदे, मेहुणा संतोष सरवदे, अजय बचाटे, आकाश तेलंगे, सासू कस्तुरा सरवदे, सासरे अर्जुन सरवदे व अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, मात्र सगुणा सातपुते अद्याप फरार आहे.