येथील पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीमुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा रस्ता बंद होणार असल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी पोलीस ठाण्याच्या भिंतीचे काम बंद पाडले. पोलीस ठाण्याने विद्यार्थ्यांना रस्ता व क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
शहरातील पाचकंदील व बसस्थानकाच्या मध्यावर नव्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. इमारतीच्या पाठीमागे मराठी माध्यमाची शाळा असून पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीमुळे मुलांना शाळेत जाण्याचा रस्ताच बंद होणार असल्याचे लक्षात येताच माजी सरपंच जितेंद्र  आहेर, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक आहेर आदींसह ग्रामस्थांनी तहसीलदार शर्मिला भोसले यांची भेट घेतली. भोसले यांना उपरोक्त ठिकाणी नेऊन संरक्षक भिंतीमुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाणारा मार्ग पूर्णत: बंद होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण तसेच परिपाठासाठी जागाच शिल्लक राहणार नाही हे लक्षात
आणून दिले.
या शाळेचा लोकसभा, विधानसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केंद्र म्हणून वापर होतो. संरक्षक भिंतीचे काम झाल्यास मतपेटय़ा ने-आण करण्यासाठी मोठी वाहने येऊ शकणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी वाहन शाळेच्या आवारात येऊ शकत नसल्याने भिंतीचे काम करू नये असा पवित्रा नागरिकांनी घेतला.
या वेळी पोलीस निरीक्षक बाबासाहेब पाचपुते यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तहसीलदारांच्या उपस्थितीत हे काम बंद पाडण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात पुढील दिशा निश्चित होईपर्यंत काम बंद ठेवावे, असे भोसले यांनी सूचित केले.
संरक्षण भिंतीमुळे विद्यार्थ्यांना क्रीडांगण तसेच परिपाठासाठी जागा शिल्लकराहात नसल्याने पोलीस ठाण्याने शाळेसाठी रस्ता तसेच क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांनी केली. पोलीस निरीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण विभाग व कल्याण महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याचे सांगितले.