पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींनी कासारवाडीत वास्तव्य केल्याची माहिती उघड झाल्यानंतर या भागात दुसऱ्या दिवशीही खळबळ होती. दहशतवादविरोधी पथकाने चौकशी सुरू केली असून एका इस्टेट एजंटसह काही नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्यात महिलांचाही समावेश आहे. संशयित दहशतवादी वास्तव्यास असलेला फ्लॅट नेमका कोणत्या इमारतीत आहे, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही. मात्र, येथील दोन इमारतींवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याचे समजते.
पुण्यातील जंगलीमहाराज रस्त्यावरील स्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तीन जणांना अटक करून स्फोटाचा पर्दाफाश केला. याप्रकरणी अटक केलेले तीनही आरोपी कासारवाडीत राहिले व त्यांनी हा कट पूर्णत्वाला नेण्याची कामगिरी केल्याची माहिती पुढे आली आहे. कासारवाडीतील केशवनगर भागातील शेख बिल्डिंगचा मालक व येथील सर्व रहिवाशांना  चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती. त्यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे समजते. तसेच, या भागात खरेदी-विक्री करणाऱ्या एका इस्टेट एजंटलाही ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, कासारवाडीतील रेल्वे गेटसमोरील भागात एका इमारतीत काही नागरिकांचा स्फोटाच्या घटनेपूर्वी संशयास्पद वावर होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली असून त्याची शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. काही अज्ञात नागरिकांनी येथे भाडय़ाने फ्लॅट घेतला.  काही दिवसांचे काम असल्याचे सांगून पाच हजार रूपये आगावू दिले व उर्वरित रक्कम नंतर देतो, असे फ्लॅटमालकास सांगितले होते. त्या ठिकाणी राहताना त्यांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती. दिवसभर ते दार बंद ठेवत होते. घरात भला मोठा एलसीडी होता, तो सातत्याने चालू ठेवण्यात येत होता. घरात प्रकाश न ठेवता झीरो बल्ब लावला जात होता. त्यांनी इमारतीत कोणाशी संबंध ठेवले नव्हते. मात्र, आवश्यक गोष्टींसाठी त्यांचा वावर जवळपासच्या भागात होता. फ्लॅट सोडून जाताना त्यांनी दाराला फक्त कडी लावली व ते निघून गेले. दोन-तीन दिवसांनी शेजारच्या रहिवाशांनी फ्लॅटच्या मालकास दूरध्वनी करून ही बाब कळवली. त्यानंतर मालकाने येऊन फ्लॅटला कुलूप लावले, अशी माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. या सर्व माहितीची खातरजमा केली जात आहे. पोलिसांनी आरोपींची छायाचित्रे परिसरातील नागरिकांना दाखवली व त्यांची अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते.
बॉम्बस्फोटातील आरोपी कासारवाडीत राहिल्याचे समोर आले आहे. ते राहत असल्याची माहिती पोलिसांना मालकांनी दिली होती का, याबाबत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना विचारले असता, भाडेकरूंची माहिती दिली का, याची माहिती घेतली जात आहे. माहिती दिली नसल्यास मालकांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात इंडियन मुजाहिद्दीनचे जाळे वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता आम्ही याबाबत सतर्क आहोत, असे पोळ म्हणाले.