शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करून सुरक्षा वाढविण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी आश्वासन दिल्यावर मंगळवारी मेडिकलच्या एक्स रे विभागात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरणाऱ्या युवकास व वाहन चोरून नेणाऱ्या चोरटय़ाची नागरिकांनी धुलाई केली.
गेल्या एक महिन्यापासून मेडिकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  मेस्कोच्या सुरक्षा रक्षकांना चोरटे जुमानत नाही. त्यामुळे मेडिकल प्रशासनाने नुकतीच पोलीस आयुक्त कौशल पाठक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पाठक यांनी मंगळवारी मेडिकल परिसरात भेट देऊन गस्त वाढविण्यासंदर्भात आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. एक्सरे विभागात रुग्णांची मोठी रांग असते या संधीचा फायदा घेत चोरटय़ाने महिलेच्या गळयातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली आणि चोरटय़ाला पकडून नागरिकांनी चांगलीच धुलाई केली.
दुसरी घटना दुपारी मेडिकल परिसरातील कॅन्टीन समोर घडली. या ठिकाणी उभे असलेले वाहन चोरून नेणाऱ्या चोरटय़ाला सुरक्षा रक्षकांनी पकडल्यानंतर त्याचीही चांगली धुलाई केली. ते जखमी झाले होते त्यामुळे त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार करून पोलिसांच्या स्वाधीन केले.