02 March 2021

News Flash

जि. प. सदस्यांच्या मानापमानामुळे पालकमंत्र्यांची बैठकच रद्द

जिल्हा परिषदेशी संबंधित बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सदस्यांनाच निमंत्रण न देण्यात आल्याने सदस्यांनी पालकमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर ही बैठकच रद्द करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांना घ्यावा

| May 1, 2013 02:08 am

जिल्हा परिषदेशी संबंधित बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सदस्यांनाच निमंत्रण न देण्यात आल्याने सदस्यांनी पालकमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर ही बैठकच रद्द करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांना घ्यावा लागला.
जिल्ह्य़ातील पाच आमदारांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना एक पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या गेल्या आर्थिक वर्षांतील कामांचा लेखाजोखा आणि आढावा घ्यावा, अशी विनंती केली  होती. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत सध्या जिल्ह्य़ात एकही काम सुरू नाही. नवीन कामांचा कार्यादेश काढला जात नाही. सर्व कामे ठप्प पडल्याने आणि नियोजन नसल्याने या वर्षांतही कामे होणार नाहीत, असे या आमदारांचे म्हणणे आहे.
पालकमंत्र्यांनी आमदारांच्या पत्रानंतर विभागीय आयुक्तांना एक पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची तातडीची बैठक बोलावण्याची सूचना दिली. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळवले. मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह्य़ातील आमदार आणि जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीविषयी माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली. जिल्हा परिषदेशी संबंधित बैठकीला सदस्यांनाच निमंत्रण नसल्याबद्दल नाराजीचा सूर उमटला. सोमवारीच नाराजी व्यक्त करणारे पत्र सदस्यांनी विभागीय आयुक्तांना पाठवले. दरम्यान, सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी जिल्हा परिषदेचे काही सदस्य पोहोचले. त्यांना सदस्यांच्या नाराजीविषयी माहिती देण्यात आली. काही सदस्यांनी तर बैठकस्थळी ठिय्या देण्याचाही निर्णय घेतला होता. अखेर ही बैठकच रद्द करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला. संतप्त सदस्यांना त्याविषयी माहिती देखील देण्यात आली.
जिल्ह्य़ातील आमदारांपैकी तीन आमदार मुंबई येथे एका आढावा बैठकीसाठी गेल्याने ही बैठक रद्द करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले खरे, पण जिल्हा परिषद सदस्यांच्या नाराजीमुळेच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. या बठकीला जिल्हा परिषद अध्यक्षांनाही बोलावण्यात न आल्याने अनेक सदस्य संतप्त झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 2:08 am

Web Title: radhakrishna vikhe patil cancelled the meeting
Next Stories
1 भंडाऱ्यातील अवैध बांधकामांवर कारवाईची मनसेची मागणी
2 भारसाकळे भाजपचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षपदी तुषार भारतीय
3 जिल्हा राष्ट्रवादीचे ताडाळीत धारीवाल कंपनीविरुद्ध धरणे
Just Now!
X