यंदा पावसाने भारताच्या किनारपट्टींवर धडक मारली असली, तरी रेनकोट आणि विण्डशिटर्सच्या खरेदीला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही.
पावसाने आगमनाची वार्ता दिल्यावर बाजारात छत्र्या आणि रेनकोट खरेदीसाठी चांगलीच गर्दी होते. मोटरसायकलस्वार, गिर्यारोहक पावसाळ्यात रेनकोट किंवा विण्डशिटर्सना पसंती देतात. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही रेनकोटमुळे बॅग, पाण्याची बाटली असा सगळा सरंजाम सांभाळणे सोपे जाते. त्यामुळे बाजारात रेनकोट आणि विण्डशिटरमध्ये काय नवीन आले आहे, यासाठी त्यांची शोधाशोध सुरू होते.यंदा पावसाळा लांबल्याची सूचना मिळाली म्हणून की काय रेनकोट, विण्डशिटर्स खरेदीला म्हणावा तसा उठाव मिळालेला नाही. तरी शनिवार-रविवारी पावसाच्या आगमनाची चाहूल मुंबईकरांना लागली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळेही मुंबईकर पावसाळी खरेदीसाठी बाजाराकडे वळलेले नाहीत.
दरवर्षी छत्र्या आणि रेनकोट्समध्ये नवनवीन फॅशन येत असतात. त्याची तरुणांनाही भुरळ पडते. यंदा प्लॅस्टिकबरोबरच नायलॉन, पॉलिस्टरचे रेनकोट्स आणि विण्डशिटर्स बाजारात पाहायला मिळत आहेत. प्लॅस्टिकच्या रेनकोट्सपेक्षा यांचे वजन कमी असते. तसेच पातळ असल्यामुळे या रेनकोट्समध्ये घामही कमी येतो.

पावसाळ्याच्या तोंडावर छत्री, रेनकोट, चपलांची खरेदी करायची हा दरवर्षीचा शिरस्ता. केरळात पावसाचे आगमन झाल्यावर आपसूक या वस्तूंच्या खरेदीला मुंबईच्या बाजारांमध्ये जोर येतो. परंतु यंदा पावसाच्या लांबलेल्या आगमनामुळे या बाजारातही जणू ‘उन्हाळी’ वातावरण आहे. छत्र्या, रेनकोट या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक नाहीत. त्यामुळे, दुकानात ज्या काही छत्र्या वा रेनकोट दिसत आहेत त्या गेल्या वर्षीच्या साठय़ातल्या आहेत. नवीन असे काही बाजारात आलेलेच नाही. दुसरीकडे पावसाळी चपलांसाठी म्हणून बऱ्यापैकी गर्दी असताना ‘व्हारायटी’ नाही म्हणून ग्राहक विशेषत: मुली आणि महिला नाइलाजानेच जे आहे त्याची खरेदी करीत आहेत. काही ‘ब्रॅण्डेड’ चपला विकणाऱ्या दुकानांमध्ये बऱ्यापैकी वैविध्य असले, तरी त्यांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने तेथेही फारसा उठाव नाही. थोडक्यात खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर दिसतो तो ‘मान्सून’च्या प्रतीक्षेत असलेला बाजार.

गुडघ्यापर्यंतच्या विण्डचीटर्सना पसंती
कमरेऐवजी पायापर्यंतच्या लांब विण्डशिटर्सना यंदा मागणी असून यामध्ये जॅकेट आणि ट्राऊझरचा समावेश असतो. तसेच मुलींमध्येही गुढघ्यापर्यंतच्या लांबीच्या रेनकोट्सना पसंती आहे. कमरेला बेल्ट असलेले विण्डशिटर्सही मुलींमध्ये प्रसिद्ध आहेत. मागच्या वर्षीच्या प्रिंटेड रेनकोट्सऐवजी प्लेन रेनकोट्स बाजारात पाहायला मिळतात. बच्चेकंपनीसाठी डोरेमॉन, छोटा भीमचे फोटो असलेले रेनकोट पाहायला मिळतात. सध्या बाजारात लहान मुलांच्या रेनकोट्सची किंमत ८०० रुपयांपासून, तर मोठय़ांच्या रेनकोट्सची किंमत १५०० रुपयांपासून सुरू आहे.

किमतीवरही परिणाम
सध्या रेनकोट आणि विण्डशिटर्सच्या दरांमध्ये मागच्या वर्षीपेक्षा फारसा बदल झालेला नाही. उलट मागणी कमी असल्यामुळे आम्हीच किमती मर्यादित ठेवल्या आहेत. पण पावसाला सुरुवात होताच मागणी वाढेल अशी आशा आहे. त्यानंतर मात्र किमती १० ते २० टक्क्यांनी वाढतील.
एस. जे. राठोड,
मेन मिनी मेन शॉप, दादर