जरा विचार करा, तुम्ही तुमच्या लाडक्या कुत्र्याला सोबत घेऊन सकाळचा फेरफटका मारायला निघाला आहात. पावसाचे दिवस आहेत त्यामुळे तुमच्या हातात छत्री आहे पण तुमच्या लाडक्या कुत्र्याचे काय? पाऊस आला तर तो भिजून आजारी पडणार हे नक्की पण त्या आधी त्याच्या चिखलाने बरबरटलेल्या पायांनी तुमचे घरही रंगणारच. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यातल्या या रडगाण्यावर डिझाइनर सोनिया वाजिफदार यांनी खास उपाय शोधला आहे. तुमच्या लाडक्या कुत्र्यांसाठी खास रेनकोट्स आणि शूजचे कलेक्शन घेऊन ती आली आहे!
अर्थात कुत्रा पाळणाऱ्यांच्या श्वानप्रेमाचे अनेक किस्से जगप्रसिद्ध आहेत. बरं या मंडळीना फक्त कुत्रा पाळून भागत नाही. तर पर्यायाने त्याचे लाड करणेही आलेच. त्याला गोंजारणे, प्रेमाने न्हाऊमाखू घालणे त्यांच्यासाठी खास प्रकारचे खाण्याचे पदार्थ आणणे हे सर्व त्यासोबत आलंच. बरं ही स्पेशल वागणूक केवळ घरापुरतीच असते असेही काही नाही. कुत्र्यांच्या ब्युटी सलून्समधली वाढती वर्दळ आणि तिथे स्पापासून ते हेअरकटपर्यंत होणारे त्यांचे लाड पाहिले की आयुष्यात आपण आपले तरी इतके लाड कधी करुन घेतले होते का, हा प्रश्न पडतो. हे सगळं करुन घेतल्यावर या सजलेल्या कुत्र्यांसाठीच्या खास ब्युटी स्पर्धाही होणे स्वाभाविकच आहे.
याचेच पुढचे पाऊल म्हणजे पावसाळा आणि डिझाइनर कलेक्शन्सबाबत लोकांना असलेले वेड लक्षात घेऊन सोनिया वाजिफदारने खास डिझाइनर कुत्र्यांसाठी खास रेनकोट्स आणि शूजचे कलेक्शन काढले आहे. यासंबंधी सोनियाने सांगितले, माझ्या घरी एक कुत्रा आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्याला दिवसातून ४-५वेळा फिरायला घेऊन जाणं आणि प्रत्येकवेळी भिजून आल्यावर त्याला सुकवणे हे मोठे काम असायचे. त्यामुळे यंदा कुत्र्यांसाठी रेनकोट तयार करण्याचे मी ठरवले. आतापर्यंत तुम्हाला स्वतसाठी डिझाइनर रेनकोट तयार करुन मिळत होते पण आता तुमचे कुत्रेपण स्टाइलमध्ये मागे राहणार नाहीत.
विशेष म्हणजे हे रेनकोट आणि शूज तूम्हाला कस्टममेड तयार करुन मिळणार आहे. छान ब्राइट रंगाचे किंवा प्रिंट्समध्ये उपलब्ध असलेले हे रेनकोट्स आणि बूट तुमच्या कुत्र्याच्या आकारमानानुसारखास शिवून घेण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार आहे.  तुमच्या कुत्र्याला रंग किवा प्रिंट्स आवडत नसतील तर पारदर्शक रेनकोटचा पर्यायही तुमच्याकडे आहे. अर्थात या सर्वासाठी तुम्हाला बऱ्यापैकी किंमत मोजावी लागणार आहेच, पण म्हणतात ना, हौसेला मोल नसते. त्यामुळे होऊ द्या खर्च..