पदाधिकाऱ्यांची बैठक.. चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क आणि गोदा पार्कसह सिंहस्थासाठी चाललेल्या रस्ता कामांची पाहणी.. पालिका आयुक्त आणि वास्तुविशारदांशी चर्चा.. असे नेहमीप्रमाणे कामकाज करत राज ठाकरे यांनी गुरुवारी आपला दोन दिवसीय नाशिक दौरा आटोपता घेतला. सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, विकास कामांना गती देण्याचे सूचित करताना त्यांचा दर्जा सांभाळण्यास त्यांनी बजावले. इतकेच नव्हे तर, सिंहस्थाची जबाबदारी महापालिकेची नसुन ती राज्य शासनाने उचवावी, असेही त्यांनी सूचित केले. नाशिक फस्ट संस्थेतर्फे वाहतुकीच्या नियमांचे परिपूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘चिल्ड्रन टॅफिक पार्क’ची उभारणी करण्यात येत आहे. या अनोख्या उद्यानासाठी महापालिकेने जागा दिली आहे. या व्यतिरिक्त पालिकेचा या प्रकल्पाशी तसा थेट काही संबंध नसताना राज यांनी कामाची पाहणी करत मनसेच्या कार्यकाळात ते नागरिकांसाठी खुले केले जाईल याकडे लक्ष ठेवल्याचे अधोरेखीत झाले.
नाशिक महापालिकेची सत्ता मनसेच्या ताब्यात आल्यापासून विकास कामे होत नसल्याची सुरू झालेली ओरड आजतागायत थांबलेली नाही. भाजपच्या साथीने पहिली अडीच वर्ष संसार केल्यानंतर पुढील काळात मनसेने राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ घेतली. निधीअभावी कामे होत नसल्याची ओरड खुद्द पक्षाचे नगरसेवक करत आहेत. काही दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठींबा दिला. या घडामोडीनंतर प्रथमच नाशिक भेटीवर आलेले राज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. गुरुवारी पत्रकारांशी काही मिनिटे अनौपचारीक गप्पा मारल्या असल्या तरी त्यास प्रश्नोत्तरांचे स्वरुप येणार नाही याची दक्षता घेतली. आदल्या दिवशी सायंकाळी राज यांचे आगमन झाले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर पुलावरून बरेच पाणी वाहून गेले. विधानसभा निवडणुकीत मनसेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या प्रमुख नेत्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्यात धन्यता मानली. यामुळे पक्ष बांधणीवर पुन्हा लक्ष केंद्रीत करताना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना त्यांनी नेहमीप्रमाणे कार्यप्रवण होण्याचे आवाहन केले. गुरुवारी त्यांनी गोदा पार्क आणि चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क या प्रकल्पांच्या कामांची पाहणी केली. सिंहस्थ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने चाललेल्या रस्त्यांच्या कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, सभागृह नेते शशिकांत जाधव, जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे, महानगरप्रमुख अ‍ॅड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते.
सिंहस्थाची अनेक कामे अद्याप सुरू झाली नसल्याचे निदर्शनास आल्यावर राज यांनी सिंहस्थाची जबाबदारी महापालिकेची नसून ती राज्य शासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले. सिंहस्थ तोंडावर आला असल्याने संबंधित कामे लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे तसेच या कामात दर्जा सांभाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वास्तु विशारद व पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी झालेल्या चर्चेत शहराच्या सौंदर्यीकरणाबाबत त्यांनी सूचना केल्या. नाशिक फस्ट संस्थेच्यावतीने चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कची उभारणी करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने जागा दिली असून वाहतूक नियमांचे शिक्षण देणारे हे अभिनव उद्यान ठरणार आहे. सकाळी दहा वाजता ते या ठिकाणी भेट देणार होते. तथापि, त्यांचे आगमन झाले ते दुपारी दीड वाजता. संस्थेच्या विनिता धारकर यांनी प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती दिली. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. नाशिकमधील बडय़ा उद्योगांनी त्यासाठी देणगी दिली आहे. विद्यार्थ्यांसह सर्व प्रकारच्या चालकांना वाहतुकीचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे. पुढील महिन्यात या उद्यानाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. नाशिकमध्ये विकास कामे होत नसल्यावरून ओरड सुरू असल्याने मनसेच्या कार्यकाळात हे उद्यान नागरिकांसमोर जावे असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.

‘विकासाचा अॅप’ही नाही
नाशिक शहरातील विकास कामांची माहिती देण्याच्या उद्देशाने साकारल्या जाणाऱ्या मनसेच्या अॅपचे अनावरण काही या दौऱ्यात झाले नाही. तसा विषयी चर्चेला आला नाही. महापालिकेची सत्ता प्राप्त झाल्यावर पक्षाने शहरात कोणती कामे केली याची माहिती नागरिकांपर्यंत अॅपद्वारे पोहोचविण्याची तयारी मनसेने केली आहे. पक्षाचा हा अॅप इतर समाज माध्यमांनाही जोडला जाणार आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्याचे गुरुवारी अनावरण होणार असल्याचे सांगितले गेले. तथापि, प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.