एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’त अस्थीभंगासारख्या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियांचा समावेश नसल्याने अंधेरीतील एका वृद्ध महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीकरिता दारोदार फिरण्याची वेळ आली आहे.
सईबाई नामदेव लव्हांडे (वय ६८) या साकीनाका येथील ‘लाल बहादूर शास्त्रीनगर’ या झोपडपट्टीत राहतात. घसरून पडल्याने त्यांचे उजव्या मांडीचे हाड मोडले. तेव्हापासून गेले तीन आठवडे त्या अंथरूणावर आहेत. केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मांडीचे हाड सांधण्याकरिता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, त्या करिता २६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या शिवाय वॉकर, वॉटरबेड आदींकरिताही काही हजार रुपये लागणार आहेत.
लव्हांडे कुटुंबीय अल्प उत्पन्न गटातील असल्यामुळे त्यांना इतका खर्च परवडणारा नाही. त्यामुळे, त्यांनी रुग्णालयातच ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’अंतर्गत आर्थिक मदत मिळावी म्हणून अर्ज भरून दिला. मात्र, येथेही दुर्दैव आड आले. नेमका अस्थीभंगासारख्या शस्त्रक्रियेचा या योजनेत समावेश नसल्याने त्यांना ‘जीवनदायी’चा लाभ मिळणार नाही, असे सांगण्यात आले. ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ आजपर्यंत अनेक गरीब रुग्णांना ‘जीवनदान’ देणारी ठरली आहे. मात्र, योजनेत समाविष्ट असलेल्या ९७२ वेगवेगळ्या उपचारांमध्ये नेमका अस्थीभंगासारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियेचा समावेश नसल्याने अनेक गरजू त्यापासून वंचित राहत आहेत. ही या योजनेतील त्रुटी असून दूर करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.  सईबाईंचा मुलगा विश्वनाथ लव्हांडे आता विविध धर्मादाय संस्थांकडे वैद्यकीय उपचारांकरिता उपलब्ध असलेला निधी आपल्या आईच्या उपचारांकरिता मिळावा यासाठी आमदार, नगरसेवकांच्या कार्यालयांत खेटे घालत आहे. सईबाईंची दोन्ही मुले हातावर पोट असलेली आहेत. त्यामुळे, आईच्या उपचारांकरिता एकदम २६ हजार रुपये उभे करणे त्यांना शक्य नाही. ‘डॉक्टरांनी वॉकर आणायला सांगितला म्हणून त्यासाठीचे ९०० रुपयेही मी कसेबसे जमा केले. पण, वॉटर बेडसाठीचे दोन हजार रुपये जमा करणे मला अद्याप जमलेले नाही. त्यातून एकरकमी २६ हजार रुपये कसे आणावे असा आता आमच्यापुढे प्रश्न आहे,’ असे विश्वनाथ लव्हांडे यांनी सांगितले.