अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या आंदोलनावर अजूनही तोडगा निघाला नाही. अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. बसस्थानक ते जि.प. दरम्यानची वाहतूक या मोर्चामुळे खोळंबली होती.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ६ जानेवारीपासून संप पुकारला आहे. संपात राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्यामुळे संपूर्ण अंगणवाडय़ा बंद आहेत. संपात राज्यातील २ लाख १० हजार, तर परभणी जिल्ह्यातील ३ हजार ८०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. मानधन वाढवावे, उन्हाळी सुट्टी एक महिन्याची करावी, सेवा समाप्तीनंतर इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्तिवेतन द्यावे, संपकाळातील मानधन कपात करू नये आदी मागण्या आहेत.
सर्वशिक्षा अभियान कार्यालयासमोरून महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा बसस्थानकमाग्रे जि.प.वर धडकला. प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, मुगाजी बुरूड यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.