टीव्हीवरच्या मालिका, रिअ‍ॅलिटी शो किंवा काल्पनिक कथानकांवरच्या ढीगभर तथाकथित लोकप्रिय मालिका या सध्या केवळ आणि केवळ टीआरपी-जीआरपीचा वेलू गगनावरी नेण्यासाठी आटापिटा करतायेत. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांतील वाहिन्या आणि त्यांच्यावर सुरू असणाऱ्या मालिकांचा गेल्या काही महिन्यांतला आढावा घेतला तर टीआरपीचे गणित जमवण्याच्या नादात मूळ विषय सोडून केवळ तगडे लोकप्रिय कलावंत, महागडे लोकेशन्स, श्रीमंती घरांचे सेट्स आणि नाटय़ निर्माण करण्यासाठी रोज काही ना काहीतरी अतिरेकी प्रसंगांचे चित्रण अशा पद्धतीने भरकटल्या आहेत. कलर्स वाहिनीवरची ‘बालिका वधू’, ‘ससुराल सिमर का’ या गाजलेल्या मालिका, एकता कपूरची सोनीवरची ‘बडे अच्छे लगते हैं’ असो, नाहीतर झी टीव्हीवरची ‘पवित्र रिश्ता’. स्टार प्रवाहवरील ‘पुढचे पाऊल’ असो, ‘देवयानी’ असो, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, नाहीतर झी मराठीवरची ‘तू तिथे मी’. या मालिकांमधली मूळ कथा संपली, आधीचे कलाकार बदलले, मालिकांमधल्या कथानकानेही पिढय़ा न् पिढय़ांच्या उडय़ा घेतल्या तरी त्यांचे नित्य दळण अजून सुरूच आहे. प्रेक्षकांचे निर्भेळ मनोरंजन करण्यापेक्षाही केवळ टीआरपीसाठी मालिकांच्या निर्मात्यांची ही सर्कस सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘बालिका वधू’ ही मालिका कलर्स वाहिनीवर सुरू झाली ती बालविवाहासारखा विषय घेऊन. आजपर्यंत कोणीही हात घातला नव्हता असा सामाजिक विषय घेऊन ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीतच लोकप्रियही झाली. मात्र ‘बालिका वधू’चे आनंदी आणि जग्या दोघेही मोठे झाले, जग्याचे प्रेमप्रकरण, त्यातून आनंदीला बाहेर काढणं, मग तिचं लग्न हे सगळं झालं. तरीही ‘बालिका वधू’ सुरूच आहे. आता यात बालविवाहाच्या गोष्टी नव्हेत तर इतरांसारखीच प्रेमप्रकरणे, कटकोरस्थाने सुरू आहेत. मालिकेत आता आनंदी तिसऱ्यांदा बदलण्यात आली आहे. असा सगळा फाफटपसारा असला तरी केवळ टीआरपीत अजूनही अव्वल असल्याने मालिका सुरूच आहे. बालिका वधूची तेव्हा छोटी असलेली आनंदी अविका गौर कलर्सच्याच ‘ससुराल सिमर का’ मालिकेत मोठी होऊन मुख्य भूमिकेत चमकली आहे. इथे तर सिमरच्या ससुरालमध्ये नेमकं काय चाललंय याचा पत्ताच लागत नाही. राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यामुळे लोकप्रिय झालेली ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकोही केवळ त्या दोघांसाठीच सुरू असल्यासारखी वाटते आहे. तर एकताचा झी टीव्हीबरोबरचा ‘पवित्र रिश्ता’ही संपत नाही. मालिका संपत नाही म्हणून नायिका अंकिता लोखंडेला सुट्टी मिळत नाही. मग कधीतरी तिला महिनाभराची खरी सुट्टी मिळते, तर मालिकेच्या कथेत प्रचंड उलथापालथ होऊन नायिका चक्क कोमात जाते. महिन्याभराने अंकिता परतल्यावर मालिकेची नायिका कोमातून बाहेर येते. मालिकेत कथा आहे म्हणून हे बदल केले जातात की मोठे कलाकार आहेत ते टीव्हीवर दिसले पाहिजेत म्हणून हे बदल केले जातात?

मालिका आणि चित्रपटांसाठी दीर्घकाळ काम केलेल्या एका लेखकाने दिलेल्या माहितीनुसार पूर्वी मालिका म्हणजे मूळ कथा, त्याला पटकथेचा साज चढवायचा आणि त्यावर खटकेबाज संवादांची फोडणी द्यायची असे तीन टप्पे पूर्ण झाले की त्याचे यशस्वी चित्रीकरण केले जात होते. आता मात्र बऱ्याचदा निर्मात्यांकडून एखादी संकल्पना सुचवली जाते आणि त्यावर त्यांना हवी तशी कथा, संवाद लिहून देण्याचा आग्रह केला जातो. यात बऱ्याचदा कथेपेक्षा त्यातले कलाकार आणि श्रीमंती डामडौल कसा दिसेल.. हे जपतच मालिकांचे लेखन करावे लागते. खरेतर मालिकांचे लेखक, पटकथाकार आणि संवादलेखक यांची फळी ही प्रेक्षकांची किमान वैचारिक समान पातळी अनुलक्षून लेखन करते. तसेच ते अपेक्षित आहे. परंतु टीआरपी वाढवायचा असेल तर वैचारिक प्रेक्षकांपेक्षाही केवळ मनोरंजनाची भूक असणारा प्रेक्षक कारणीभूत असतो, असा अंदाज मांडून त्यानुसार अतिरंजित व्यक्तिरेखा, पटकथेतील अतिनाटय़मय बदल आणि त्याला संवादांची फोडणी देण्याची कसरत लेखक मंडळींना करावी लागते आहे. याला मराठी वाहिन्याही अपवाद नसल्याचे या लेखकाने सांगितले. तीन-चार मराठी वाहिन्यांमध्ये असलेली टीआरपी-जीआरपीची स्पर्धा सातत्याने तीव्र होतेय. जीआरपी मिळाला तर जाहिराती मिळणार, जाहिराती मिळाल्या तर पैसा येणार आणि पैसा मिळाला तर त्या त्या मालिकांच्या निर्मात्यांची मालिका टिकणार आणि पर्यायाने वाहिनीला फायदा होणार असे सगळे गणित धरून सध्याच्या मालिकांची निर्मिती केली जात आहे. जोपर्यंत हे दुष्टचक्र भेदले जाणार नाही तोपर्यंत या मालिका अशाच भरकटत राहणार का, असा सवालही याच क्षेत्रातील बुद्धिजीवी वर्गाकडून केला जातो आहे.