राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथे सीमा तपासणी नाक्याच्या कार्यालयासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीला शासनाकडून अल्प मोबदला दिला जात असल्याच्या कारणामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी जमिनीचा कब्जा देण्यास विरोध करीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक दीर्घकाळ खोळंबली होती.    
कागल येथे सीमा तपासणी नाक्याचे अद्ययावतीकरण व संगणकीकरण करण्यासाठी महामार्गालगतची, दुधगंगा नदी परिसरातील ५३ शेतकऱ्यांची ४२ एकर जमीन संपादित केली आहे. जमिनाला रास्त मोबदला मिळत नसल्याने शेतकरी व शासनामध्ये गेल्या अनेक वर्षांंपासून वाद आहे. गुंठय़ाला २ लाख रुपये दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शासकीय मोबदला गुंठय़ाला ६८ हजार ते १ लाख १७ हजार इतका दिला जात आहे. या दरामध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाचा निकाल लागल्याशिवाय जमिनींचा कब्जा घेऊ नये, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. गेली सव्वा वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयातील सुनावणी वेळी शासनाचे प्रतिनिधी गैरहजर असतात. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शासनाकडे लोक न्यायालयाचा पर्याय खुला ठेवला आहे. तरीही शासनाकडून जबरदस्तीने कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने मंगळवारी संबंधित शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. यावेळी मंडल अधिकारी बारापात्रे व तलाठी शमा मुल्ला उपस्थित होते. महसूल विभाग व प्रादेशिक विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.