नवीन पिढीची संवेदनशीलता बोथट झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. विशेषत: ‘अपवर्डली मोबाइल’ असा जो नवा वर्ग निर्माण झाला आहे त्यांची समाजातील अन्य लोकांविषयी असलेली सहानुभूतीची भावना, एकुणात संवेदनशीलता कमी होतेय की काय असे वाटू लागले आहे. याच संकल्पनेवर आपल्याच कथेवर आधारित ‘इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपट बनविला आहे, असे ज्येष्ठ लेखक, नाटककार आणि आता दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या रत्नाकर मतकरी यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. थेटपणे, सरळसोट पद्धतीने गोष्ट सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे मतकरी यांनी केला आहे. नाटक, टीव्ही मालिका या माध्यमांनंतर मतकरी चित्रपट माध्यमाकडे वळले आहेत. २० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
टीव्ही मालिकांसाठीच्या पटकथा लेखनाचा अनुभव होताच; परंतु आपल्या अनेक कथा या चित्रमय शैलीतील आहेत, असेही अनेकांनी म्हटले होते. इन्व्हेस्टमेंट या कथेवर चित्रपट करण्याची कल्पना अनेक वर्षांपासून डोक्यात होती. काही लोकांकडून चित्रपट करण्याची तयारी दाखविण्यात आली होती, परंतु आपली कथा आपण अधिक चांगल्या पद्धतीने कथेच्या गाभ्यानुसार सांगू शकू असे वाटल्याने आपण दिग्दर्शन करण्याचे ठरविले, असे मतकरी यांनी नमूद केले. हा वास्तववादी चित्रपट आहे. समाजाच्या सर्व आर्थिक-सामाजिक थरांतील प्रेक्षकांना जोडून घेऊ शकेल अशी प्रातिनिधिक गोष्ट चित्रपटातून मांडताना आपण सामाजिक विधान केले आहे.
चित्रपटाचा विषय गंभीर असला तरी अतिशय सरळसाध्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला असून राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला हा चित्रपट मराठी रसिकांनाही आवडेल असा दावा मतकरी यांनी केला.
‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटात प्रहर्ष नाईक, सुप्रिया विनोद, तुषार दळवी, संदीप पाठक, सुलभा देशपांडे असे कलावंत प्रमुख भूमिकेत असून चित्रपटाच्या गाभ्याला अनुसरून आवश्यक तितकेच संगीत, पाश्र्वसंगीत आणि एकूणच चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे. फीचर फिल्म असली तरी जगभरात ज्या पद्धतीची चित्रनिर्मिती केली जाते आणि ज्या पद्धतीने चित्रपटाकडे पाहिले जाते त्या दृष्टिकोनातून चित्रपट दिग्दर्शित केल्याचे मतकरी म्हणाले.