आंबेडकरी चळवळीत आता पुढाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली असून प्रत्येकाचा नेता बनण्याचा प्रयत्न संघटनेस मारक ठरणारा आहे. आंबेडकरी चळवळीच्या हितासाठी नेत्यांऐवजी बहुसंख्यांनी कार्यकर्ते होऊनच काम केले पाहिजे, असा चिमटा रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी आंबडेकरी चळवळीतील धुरिणांना काढला. तसेच शिवाजी पार्क नामांतरण आणि चबुतरासंदर्भात शिवसेनेच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.
 ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये १२-१२-१२ च्या मुहूर्तावर राष्ट्रीय दलित परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रामदास आठवले, इंडियन जस्टिस पार्टीचे अध्यक्ष उदित राज, भाजपचे माजी खासदार रामनाथ कोविंद, दलित पँथरचे अध्यक्ष नामदेव ढसाळ, तामिळनाडूमधील नेते कृष्णा स्वामी आदी उपस्थित होते.
 कार्यक्रमापूर्वी आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापौरांचा बंगला हटवून त्या जागी बाळासाहेबांचे स्मारक उभारले पाहिजे. तसे केल्यास समुद्रकिनारी भव्यदिव्य असे बाळासाहेबांचे स्मारक उभे राहील, असे मतही आठवले यांनी या वेळी व्यक्त केले. तसेच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कोणीही राजकारण करू नये तसेच सरकारनेही शिवसेनेच्या मागणीचा विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले. शंभर वर्षांनंतर १२-१२-१२ ही तारीख आली असून या शंभर वर्षांत दलित समाजाच्या प्रगती, अधोगती तसेच शोषणाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी देशभरातील तसेच विविध पक्षांतील नेते आले असून दलित समाजाची पुढील वाटचाल तसेच उत्कर्षांसाठी १२ कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. देशात दलित व आदिवासींची लोकसंख्या २५ टक्के असून त्यानुसार केंद्र सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद करायला हवी, भूमिहीन शेतकऱ्यांना पाच एकर जमीन द्यावी, सहकार क्षेत्रात संधी द्यावी, खासगी क्षेत्रात आरक्षण द्यावे, नोकऱ्या द्याव्यात आदी मागण्यांचा समावेश असून त्या केंद्र सरकारकडे मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एफडीआयमुळे दलित समाजाला काहीच फायदा होणार नसून त्यामुळे समाजाचे नुकसानच होणार आहे. त्यामध्ये दलित समाजाला आरक्षण दिले तरच त्याचा फायदा होऊ शकतो, असे मत उदित राज यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. ज्या बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालो, विकास झाला, त्यांनाच आपण विसरलो आहोत, असे सांगत बाबासाहेबांचे केवळ नेते आणि त्यांचे सैनिक म्हणून काम केले तरच चळवळ सुरू राहील, असे नामदेव ढसाळ यांनी सांगितले.