टपाल खात्यातर्फे घेण्यात आलेल्या ‘पोस्ट कार्ड कथा’स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून ही स्पर्धा मराठीसह इंग्रजी, हिंदी, उर्दू, तामिळ, मल्याळम, कन्नड, संस्कृत व बंगाली भाषेत घेण्यात आली होती. मराठी भाषेतील स्पर्धेसाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेतील १,९५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. १५ ऑक्टोबर रोजी स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.
टपाल खात्यातर्फे ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोष्टमास्तर जनरल कर्नल के. सी. मिश्रा यांनी मंगळवारी ‘जीपीओ’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली.
पोस्टकार्ड कथा स्पर्धेत गोविंद मुसळे (ठाणे) यांना प्रथम क्रमांक मिळाला तर सुभाष खंकाळ (ऐरोली-नवी मुंबई) आणि पीराजी राजापूरकर (भोकर-नांदेड) यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. संस्कृत भाषेत राजेश उमळे (अकोला) यांना प्रथम क्रमांक मिळाला. चित्रकथा आणि कविता कथा या गटात अनुक्रमे जानकी कडकिया (मुंबई) व जीनल संगोई (सांताक्रूझ-पश्चिम) या पहिल्या आल्या. सवरेत्कृष्ट सादरीकरण या गटात मराठी भाषेसाठी दीपक परब (कांदिवली-पश्चिम) यांची तर सवरेत्कृष्ट हस्ताक्षरासाठी प्रफुल्ल पाटील (डोंबिवली) यांची निवड करण्यात आली आहे.अनिका डगरे (माहीम) हिची सर्वात लहान स्पर्धक तर गोपालकृष्ण हुंगुड (खारघर-नवी मुंबई) यांची सगळ्यात वयोवृद्ध स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली. या दोघांची वये अनुक्रमे ज्युनिअर के.जी. आणि ८६ वर्षे अशी आहेत. सवरेत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक अनुजा माळी (मिरज-सांगली) यांना मिळाले आहे.
विजेत्या पोस्टकार्ड कथांचे प्रदर्शन जीपीओ-मुंबई येथे कार्यालयीन वेळेत ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सर्वासाठी खुले आहे.